रायबाग तालुक्यातील सुटट्टी येथे एका उसाच्या शेतात धाड टाकून कुडची पोलिसांनी 25 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
हनुमंत संतराम अक्केण्णावर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, सुटट्टी गावामध्ये एका उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहिती आधारे अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे व रायबागचे पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज दरीगोंड व त्यांचे सहकारी पोलीस वाय. एम. हलकी, के. आर. साळुंखे, जी. एन. इंचल, ए. एम. मुत्नाळ, एस. के. पाटील, पी. ए. गड्डेकर, पी. डी. चव्हाण, व एस. बी. पुजारी यांनी काल बुधवारी संबंधित शेतात धाड टाकली.
या धाडीमध्ये पोलिसांनी 25 हजार रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त करण्याबरोबरच गांजा लागवड करणाऱ्या हनुमंत अक्केण्णावर याला अटक केली. याप्रकरणी कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.