स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्याग आणि बलिदान आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या जीवनातील 27 वर्षे कारावास भोगणाऱ्या सावरकरांचे विशेष करून बेळगाव कारागृहात 100 दिवस वास्तव्यास होते. स्वातंत्र्यासाठी त्यांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून आज चव्हाट गल्ली येथील क्रांतिवीर नाना पाटील चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून ती प्रतिमा मंडपात लावण्यात आली.
शहराच्या उत्तर मतदार संघात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सावरकर यांची प्रतिमा, बॅनर आणि टीशर्ट्स वाटप करून गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार चव्हाट गल्लीतील नाना पाटील चौकातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाकडे सावरकर व टिळकांची प्रतिमा सुपूर्द करून मंडपात त्यांचे अनावरण करण्यात आले. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यातद्वारे सदर प्रतिमा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ करणाऱ्या लोकमान्य टिळक व वीर सावरकर यांच्या प्रतिमांचे आम्ही बेळगाव उत्तर मतदार संघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाटप करत आहोत. मुंबईपाठोपाठ देशात बेळगावात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिण भारतात भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणारे बेळगाव एकमेव शहर आहे. बेळगावच्या गणेशोत्सवाला 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. इतकी मोठी परंपरा लाभणे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यासाठी टिळक व वीर सावरकरांच्या एकूण 200 प्रतिमा तसेच 10 हजार टी-शर्ट्स आणि बॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगितले.
प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागली तर उत्सव साजरा होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी लागत असेल तर सण कशासाठी? असा सवाल करून वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या सारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा लावण्यासाठी आम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही. कोणीही यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आपण जे ठरवतो तेच करतो, असेही आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी 100 दिवस हिंडलगा कारागृहात कारावास भोगला असल्यामुळे कारागृहासमोर त्यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले. तसेच हिंडलगा ग्रामपंचायतशी चर्चा करून यावर पुढील निर्णय घेऊ असेही सांगितले
सार्वजनिक गणेश मंडपात स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा फोटो लावण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही: आमदार बेनके –
गणेश मंडळांना बेनके यांनी वितरित केल्या सावरकर यांच्या प्रतिमा pic.twitter.com/PWdgR8ibDW— Belgaumlive (@belgaumlive) September 3, 2022