तेरदाळ आणि हारूगेरी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील चोरीच्या घटनांप्रकरणी हारूगेरी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याच्या आभूषणांसह चोरीचा एकूण 6 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची अशी की, गेल्या शुक्रवारी हारूगेरी येथे मोटरसायकलवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हारूगेरी पोलीस ठाण्यात तिघांची चौकशी केली असता त्यांनी हारूगेरी, मुगळखोड आणि तेरदाळ येथे सोन्याची आभूषणे आणि पाच म्हशींची चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणांसह अन्य चार चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघांसह एकूण 5 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींनी चोरलेल्या पाच म्हशींपैकी दोन म्हशींची विक्री केली असून तीन म्हशी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींवर गुन्हा क्र. 57, 157 /2022 कलम 392 भादवी, गुन्हा क्र. 158, 159 /2022 कलम 379 भादवी यासह तेरदाळ पोलीस ठाण्यातील एक प्रकरण अशा एकूण पाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हारूगेरी पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 9 हजार किमतीची 49.5 ग्रॅम सोन्याची आभूषणं, 1 लाख 90 हजार रुपये किमतीच्या तीन म्हशी, गुन्ह्यासाठी वापरलेल्या एकूण 2 लाख 95 हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली व एक गुड्स वाहन असा एकूण 6 लाख 94 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. उपरोक्त कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी हारूगेरी पोलिसांना शाबासकी दिली आहे.