अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची जी हानी झाली आहे त्याची नुकसान भरपाई सरकारने आपल्याला तात्काळ अदा करावी, या मागणीसाठी बेळगाव रयत संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सोयाबीनचे पीक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात टाकून आंदोलन केले.
अलीकडच्या काळातील सततच्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक तर संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या संबंधी शेतकऱ्यांनी आज बेळगाव रयत संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन छेडून आपल्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन सरकार -प्रशासनाला सादर केले. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः सोबत आणलेले सोयाबीन पीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर टाकून निदर्शने केली. सोयाबीन पिकाला एकरी किमान 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ज्येष्ठ शेतकरी नेते कडोलीचे आप्पासाहेब देसाई म्हणाले की गेल्या एक-दोन महिन्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीन बटाटे मका वगैरे शेत पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले आहे सदर पिक घेण्यासाठी एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो.
त्यामुळे फक्त सोयाबीन पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. पावसाने पिकाचे नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे अवघड झाले असून आत्महत्येची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेंव्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ एकरी योग्य ती किमान 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.
लॉकडाऊन काळात देखील पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून गेले होते. मात्र त्यावेळची एक पैसा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. अशीच परिस्थिती जर राहणार असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवाल करून नुकसान भरपाई देण्यामध्ये देखील सावळागोंधळ असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
नुकसान भरपाई संबंधित योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही असे सांगून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच ही भरपाई विलंब न करता तात्काळ दिली जावी, असेही आप्पासाहेब देसाई यांनी स्पष्ट केले.