रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकांचे प्राण सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या मच्छे येथील प्रशिक्षण केंद्रानजीक आज भल्या सकाळी घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता.
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र कोणीही त्या जखमी युवकाच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. सदर प्रकार त्याचवेळी तेथून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि मारिया मोरे यांच्या निदर्शनास आला.
तेंव्हा त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन स्थानिक युवकांच्या मदतीने त्या जखमी रक्तबंबाळ युवकाला तातडीने वेणूग्राम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्या युवकांचे प्राण वाचले असून उपचारांती त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.