Thursday, December 19, 2024

/

अतिक्रमण हटाव मोहिमेचा फज्जा!

 belgaum

वाढती वाहतूक, नागरिकांची वर्दळ, शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा! या साऱ्या परिस्थितीमुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्यादेखील वाढत चालली आहे.

एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्यात आलेला भोंगळ विकास फोल ठरत आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरात करण्यात आलेल्या विकासकामांचा कोणत्याच परिस्थितीत उपयोग होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक मार्गावर सध्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून यावर प्रशासन आणि रहदारी विभागाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत.

याच अनुशंगातून बुधवारी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. नेहरू नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली खरी, मात्र हि मोहीम दुसऱ्याच दिवशी बंद पडल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. बुधवारी अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर गुरुवारी पुन्हा रस्त्यावर आणि फुटपाथवर फळविक्रेत्यांचे स्टॉल्स पूर्ववत उभे करण्यात आल्याचे दिसून आले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक ठिकाणी सायकल ट्रक आणि फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथचा वापर पादचाऱ्यांना कमी आणि फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते अधिक करत आहेत. अनेक ठिकाणी पार्किंग करण्यात येत आहे तर बऱ्याच ठिकाणी फुटपाथवरच स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. शहरातील बहुतांशी भागात हि समस्या उद्भवली असून यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्याने सदर अतिक्रमणे हटविण्याचा आदेश मनपा आयुक्तांनी बजाविला होता.

यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी हनुमाननगर आणि बुधवारी सकाळी नेहरू नगर येथील फुटपाथ आणि सायकल ट्रॅक वरील व्यावसायिकांना हटविले होते. याठिकाणी मांडण्यात आलेले व्यवसाय, थाटण्यात आलेली खोकी तातडीने हटविण्याची सूचना केली होती. या मोहिमेत बऱ्याच हातगाड्या आणि व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले होते.

रस्ता सोडून व्यवसाय करण्याची सूचनाही केली होती. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेल्या कार्रवाईनंतरदेखील विक्रेते जागा सोडून हटले नाहीत तर पुन्हा स्टॉल उभे करून व्यवसाय सुरूच ठेवले आहेत. मनपा आयुक्तांनी केलेल्या सूचनेकडे कानाडोळा करण्यात आल्याचे यावरून दिसत असून अतिक्रमण मोहिमेचा फज्जा उडाल्याची चर्चा बेळगावमध्ये सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.