पोलीस असल्याची बतावणी करून महिलेकडील 50 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या एका तोतया पोलिसाला गजाआड करून संकेश्वर पोलिसांनी त्याच्याकडील सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
महंमद युसुफ इराणी (रा. सांगली) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नांव आहे. संशयास्पदरित्या फिरत असलेल्या महंमद यास महामार्ग बंदोबस्त पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने संकेश्वर -अंकले रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने लुबाडल्याचा गुन्हा त्याने कबूल केला. तसेच संकेश्वरसह निपाणी, गोकाक, गडहिंग्लज येथेही तसे प्रकार केल्याचे सांगितले.
चौकशीअंती पोलिसांनी महंमद इराणी याच्याकडून 50 ग्रॅम सोन्याची चैन, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. तसेच न्यायालयासमोर हजर करून महंमदची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगाव, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक व यमकनमर्डीचे सीपीआय भायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, हेड कॉन्स्टेबल बी. व्ही. हुलकुंद, बी. के. नांगनुरी, एम. एच. करगुप्पी, एम. एम. जंबगी, बी. एस. कपरट्टी, वाय. एच. नदाफ, बी. टी. पाटील एम. आय. चिप्पलकट्टी आदींनी उपरोक्त कारवाई केली.