राज्य सरकारकडून प्रसूत महिला आणि त्यांच्या मुलांना मोफत पुरवल्या जाणाऱ्या पोषक आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याची घटना आज मंगळवारी शिवमनगर, हिंडलगा येथील अंगणवाडी केंद्रात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवमनगर हिंडलगा येथील अंगणवाडी केंद्रात प्रसूत महिला आणि त्यांच्या मुलांना राज्य सरकारकडून मोफत पुरविल्या जाणाऱ्या पोषक आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विकास मनवाडकर यांच्याकडे आल्या होत्या.
याची शहानिशा करण्यासाठी मनमाडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज मंगळवारी सकाळी अचानक त्या अंगणवाडी केंद्राला भेट देऊन शहानिशा केली. त्यावेळी मोठ्या धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.
राज्य सरकारकडून तळागाळातील प्रसूत महिला आणि त्यांच्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी त्यांना कडधान्य, दूध पावडर, अंडी वगैरे महिन्याभराचा पोषक आहार एका किटच्या स्वरूपात मोफत पुरविला जातो. त्यानुसार संबंधित महिलांना तो आहार दरमहा मिळाला पाहिजे. मात्र शिवमनगर हिंडलगा येथील संबंधित अंगणवाडी केंद्रात प्लास्टिक पोत्यातील महिनाभराच्या आहाराच्या किटची उलथापालथ करून तो आहार छोट्या प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये वितरित करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अंड्यांच्या बाबतीत देखील हाच प्रकार असून लाभार्थींना या ठिकाणी महिनाभरासाठी म्हणून अवघी 15 ते 20 अंडी दिली जात असल्याचा आरोप आहे. इतका भ्रष्टाचार करून देखील कहर म्हणजे शिवमनगर हिंडलगा लाभार्थींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना दरमहा हा पोषक आहार न देता दोन-तीन महिन्यातून एकदा त्याचे वितरण केले जाते, असे विकास मनवाडकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे एकंदर प्रकार पाहता शिवमनगर हिंडलगा येथील अंगणवाडी केंद्राशी संबंधित अधिकारी, पर्यवेक्षक आणि अंगणवाडी शिक्षिका यांच्या संगनमताने सरकारकडून वितरित केला जाणारा पौष्टिक आहार मधल्यामध्ये मोठा प्रमाणात हडप केला जात आहे.
लाभार्थींना मात्र किरकोळ आहाराचे वितरण करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप विकास मनवाडकर यांनी केला आहे. याखेरीज लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.