बेळगाव शहरातील सदाशिवनगर व शहापूर या दोन स्मशानभूमीमध्ये गोवऱ्यांच्या माध्यमातून मोफत अंत्यसंस्कार करण्याची महापालिकेने आखलेली योजना गणेशोत्सवानंतर कार्यान्वित होणार आहे. या योजनेची जबाबदारी महापालिकेने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडे दिली आहे.
सदर योजना खरंतर गेल्या जूनच्या प्रारंभी सुरू होणार होती. मात्र योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे चालक सुरेंद्र अनगोळकर यांना अनारोग्याची समस्या भेडसावल्याने योजना सुरू झाली नाही.
मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी गोवऱ्यांचा तुटवडा भासू नये यासाठी अनगोळकर फाउंडेशनने 1 लाख गोवऱ्यांची खरेदी केली आहे त्यापैकी काही गोवऱ्या सदाशिवनगर तर कांही गोवऱ्या शहापूर स्मशानभूमीत ठेवण्यात आल्या आहेत. बेळगावात पहिल्यांदाच अशी योजना सुरू होणार असून योजना कधी सुरू होणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी काल शनिवारी संबंधित सेवाभावी संस्थेच्या चालकाशी संपर्क साधला असता त्यांनी गणेशोत्सवानंतर गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार सुरू करण्यास सांगितले आहे.
बेळगाव महापालिकेने गेल्या जानेवारी 2021 मध्ये गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कोल्हापूरला जाऊन या योजनेची माहिती घेण्यात आली होती. या योजनेसाठी महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र या ना त्या कारणास्तव योजनेला विलंब झाला होता.
बेळगाव अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्याच्या अंत्यसंस्कारास 5000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. गोवऱ्यांवरील अंत्यसंस्कार योजना सुरू झाल्यास एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. याखेरीज प्रदूषण कमी होणार असल्याचे महापालिकेचे मत आहे. तथापि या योजनेसाठी आवश्यक गोवऱ्या मिळवण्याचे आव्हान सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनसमोर असणार आहे.