बेळगाव महापालिका व्याप्तीतील अनगोळ येथील प्रभाग क्र. 51 व 52 (पूर्वीचे 6 व 5) या प्रभागांच्या अन्यायकारी वादग्रस्त पुनर्रचनेच्या विरोधात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यात 51 आणि 52 प्रभाग मध्ये निवडणुकीत उभे असलेल्या 14 जणांना पार्टी केलेलं आहे. त्यासंदर्भात आता बेळगाव मुख्य दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसह संबंधितांना नोटीस जारी केली असून या खटल्याची सुनावणी येत्या 12 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.
बेळगाव महापालिकेच्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीआधी शासनाच्या 19 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या नव्या सूचनेनुसार प्रभाग पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेनुसार बेळगाव महापालिका व्याप्तीतील प्रभाग क्र. 6 चे रूपांतर प्रभाग क्र. 51 मध्ये तर प्रभाग क्र. 5 ते रूपांतर प्रभाग क्र. 52 मध्ये करण्यात आले. मात्र ही पुनर्रचना करताना कर्नाटक पालिका कायदा -1976 च्या कलम 21 (2) चे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात आले असल्याची तक्रार माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह एकूण 15 जणांनी न्यायालयाकडे केली आहे.
गेल्या 2013 सालच्या महापालिका निवडणुकीप्रसंगी प्रभाग क्र. 6 ची मतदार संख्या 8500 पेक्षा अधिक होती. प्रभाग पुनर्रचनेनंतर या प्रभागाचे रूपांतर 51 क्रमांकाच्या प्रभागांमध्ये झाले. मात्र येथील 8,500 इतकी असलेली मतदार संख्या कमी करून 2,948 इतकी केली गेली. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 5 ची मतदारसंख्यापूर्वी 7,000 होती. प्रभाग पुनर्रचनेनंतर या प्रभागाचे रूपांतर 52 क्रमांकाच्या प्रभागांमध्ये झाले आणि येथील मतदार संख्या तब्बल 10,987 इतकी वाढविण्यात आली. मतदान केंद्रांच्या विभागणीमध्ये देखील प्रभाग क्र. 51 मध्ये फक्त 3 मतदान केंद्रे आणि प्रभाग क्र. 52 मध्ये चक्क 9 मतदान केंद्रे इतकी मोठी तफावत करण्यात आली. प्रभाग पुनर्रचनेनंतर त्यासंदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती.
त्या कालावधीत प्रभाग क्र. 51 व 52 मधील अन्यायकारक प्रकाराची रीतसर तक्रार माजी नगरसेवक गुंजटकर यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणतीच दखल घेतली गेली नसल्यामुळे विनायक गुंजटकर यांनी आपल्या अन्य 14 सहकाऱ्यांसह न्यायालयात धाव घेतली. तसेच सबळ कारणांसह अनगोळ येथील प्रभाग क्र. 6 व 5 ची पुनर्रचना कर्नाटक पालिका कायदा -1976 च्या कलम 21 (2) चे उल्लंघन करणारी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे 51 व 52 अशी पुनर्रचना झालेल्या या दोन्ही प्रभागांमधील मनपा निवडणूक निरर्थक ठरवून रद्दबादल करावी, अशी मागणीही विनायक गुंजटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या तक्रारीची दखल आता बेळगावच्या मुख्य दिवाणी न्यायालयाने घेतली असून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्यासह संबंधितांना नोटीस बजावली आहे. सदर खटल्याची सुनावणी येत्या शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. सदर खटला आता न्यायालयासमोर येणार असल्यामुळे सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.