फिश मार्केट कॅम्प येथील खानापूर रोड शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवसेंदिवस धोकादायक मनात चालला असून या ठिकाणी तात्काळ रहदारी पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती केली जावी अशी पुन्हा एकवार जोरदार मागणी केली जात आहे.
फिश मार्केट कॅम्प येथील खानापूर रोडवर महिनाभरापूर्वी अवजड वाहनाखाली सापडून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर या रस्त्यावर रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कांही दिवस तेथे पोलिसाची नियुक्ती करण्यातही आली होती.
रहदारी पोलीस गायब झाल्यानंतर स्थानिक दुकानदार व्यवसायिकांनी कांही काळ स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियंत्रण करत शालेय मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. मात्र आता पुन्हा पूर्वीची ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रहदारी पोलीस नसल्यामुळे बरेच वाहन चालक येथील रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी बेधडक वेगाने वाहने हाकत असतात. त्यामुळे शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. तेथील एका सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिल्यानंतर शालेय मुलांना कशा पद्धतीने रस्ता ओलांडण्याची धोकादायक कसरत करावी लागते हे लक्षात येते.
तरी प्रशासनाने विशेष करून वरिष्ठ रहदारी पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी कॅम्प खानापूर रोडवर संबंधित ठिकाणी रहदारी पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जाते.
पोलीस प्रशासनाने या अगोदर शाळांनी खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी जेणे करून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत होईल असे आवाहन केले होते त्यानुसार शाळांनीही याची दखल घेणे गरजेचे आहे.