Sunday, June 16, 2024

/

‘त्या’ खुनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला हादरा!

 belgaum

बेळगाव शहरात घडलेल्या 57 वर्षीय रियल इस्टेट व्यवसायिकाच्या खुनामुळे जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्र हादरले आहे. वर्षभरात जिल्ह्यात घडलेला या पद्धतीचा हा दुसरा खून आहे. पोलीस वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करीत असले तरी दोन दिवस उलटल्यामुळे या खुनाचे गुढ वाढले आहे.

सुधीर भगवानदास कांबळे यांचा गेल्या शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी कॅम्प फिश मार्केटच्या मागील बाजूस असणाऱ्या मद्रास ट्रीट या रस्त्यावरील भर वस्तीतील घरात निर्घृण खून केला. त्यांच्या छातीसह हातावर तीक्ष्ण शस्त्रांचे वार आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे बाथरूम आणि जिन्यावर रक्ताचे डाग दिसून आले आहेत.

सुधीर यांची पत्नी रोहिणी व मुले घरातील दुसऱ्या खोलीत झोपले होते. सुधीर यांची पत्नी नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 7 वाजता त्यांना उठविण्यासाठी गेली असता तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आपल्या पतीचा मृतदेह आढळून आला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मयत सुधीर यांचा मोठा भाऊ अरुण यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सुधीर शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास आपल्या घरी जाऊन आपल्या बेडरूममध्ये झोपले. तथापि त्या रात्री घरातील कोणालाही किंचाळी वगैरे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू आला नाही.

 belgaum

पूर्वी दुबईला असलेले सुधीर कांबळे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कॅम्प बेळगाव येथे परतले होते. या ठिकाणी त्यांनी जमीनजुमला खरेदी-विक्रीचा रियल इस्टेट व्यवसाय सुरू केला होता. कामात प्रामाणिक असणाऱ्या सुधीर यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. सुधीर झोपण्यास जाण्याआधीच मारेकरी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन लपले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी विशेष तपास पथक स्थापण्यात आले असून ओळखीतल्याच लोकांनी हे खुनाचे कृत्य केले असावे असा संशय आहे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सर्वांगाने तपास केला जात असून सुधीर कांबळे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. लवकरच मारेकर्‍यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी व्यक्त केला आहे.Camp murder

राजू मल्लाप्पा दोड्डबोमन्नावर या रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खुनानंतर बेळगाव शहरात घडलेला या पद्धतीचा हा दुसरा खून आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आपल्या तिसऱ्या गर्भवती पत्नीला पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या राजू दोड्डबोमन्नावर यांचा भवानीनगर टिळकवाडी येथील मंडोळी रोडवर खून करण्यात आला होता.

वाट बघत दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांनी राजू आपल्या कार गाडीतून उतरताच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्यांना ठार मारले होते. या खून प्रकरणाच्या तपासात 40 वर्षीय दोड्डबोमन्नावर यांचा खून त्यांची दुसऱ्या क्रमांकाची पत्नी 26 वर्षीय किरण हिने दोघा सुपारी किलर म्हणजे भाडोत्री मारेकऱ्यांकरवी आपल्या पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. राजू दोड्डबोमन्नावर यांना ठार मारण्याचे काम फत्ते करण्यासाठी तिने मारेकऱ्यांना 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

या खेरीज गेल्यावर्षी कणबर्गी रोड माळमारुती येथे राहणारे श्रुती कन्स्ट्रक्शनचे प्रो.प्रा. मदनकुमार भैरप्पनावर यांचे महाराष्ट्रातील कांही लोकांनी चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी कांही कागदपत्र आणि कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेऊन मदनकुमार यांची मुक्तता केली होती.

घराबाहेर बोलावून भैरप्पन्नावर यांचे कारमधून अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली आणि स्वाक्षऱ्या घेऊन झाल्यानंतर शहरानजीकच्या हिंडाल्को इंडस्ट्री जवळ पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून दिले. एकंदर या घटनांमुळे जिल्ह्यातील रियल इस्टेट क्षेत्र हादरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.