नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल ६० अतिरिक्त बस सोडल्या जाणार असून सोमवारपासून हि बससेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन विभागीय नियंत्रणाधिकारी पी वाय नाईक यांनी दिली.
कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात मोठी गर्दी होते. याकाळात दर्शनासाठी भाविकांचा मोठा ओघ असतो. यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने अतिरिक्त ६० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी यात्रा, पर्यटन आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी परिवहन विभागाकडून अतिरिक्त बस सोडल्या जातात. याचप्रमाणे यंदाही सौंदत्ती येथे नवरात्रीनिमित्त होणाऱ्या गर्दीसाठी अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी विनाथांबा बससेवा देखील धावणार आहे. याचप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्यास पुन्हा अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय देखील परिवहन विभागाने घेतला आहे.