रमेश जारकीहोळी पुन्हा निश्चितपणे मंत्री होतील. मात्र ते केव्हा मंत्री होतील हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी सांगितले.
शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना सीबीआय, ईडी सर्वांचा तपास सुरू आहे. मात्र प्रामाणिक असणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. धैर्याने चौकशीला समोर जाऊन उत्तरे दिली पाहिजेत अशी प्रतिक्रिया नलीनकुमार कटील यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरावर टाकलेल्या धाडी संदर्भात व्यक्त केली. काँग्रेस सत्तेवर असताना सर्वांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता. त्यामुळेच सर्वजण घाबरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यावेळी 9 तास चौकशी करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तर कारागृहात डांबण्यात आले होते. त्यावेळी आम्ही आंदोलनं, निदर्शनं करावयास हवी होती का? असा सवाल करून कारागृहात जाऊन आलेल्यांची आज लोक मिरवणूक काढतात ही यांची समस्या आहे, अशी टीका कटील यांनी केली.
गुजरात बरोबर कर्नाटकमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना कोणत्याही परिस्थितीत राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत. आमचे सरकार आपल्या अधिकार पदाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करेल. आम्हाला कोणत्याही निवडणुकीची गरज नाही. मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना त्याची गरज आहे, असे नलीनकुमार कटील यांनी सांगितले.
यावेळी बोलण्याच्या भरात माझे आणि सतीश जारकीहोळी यांचे गुरु एकच आहेत, असे कटील म्हणाले. खरे तर त्यांना भालचंद्र जारकीहोळी असे म्हणायचे होते, त्या ऐवजी त्यांनी अनावधानाने सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र लागलीच आपली चूक सुधारताना आपण सतीश जारकीहोळी यांच्या नावाने सतत ओरडत असल्यामुळेच त्यांचे नांव आपल्या तोंडी आल्याचे सांगून माझे आणि भालचंद्र जारकीहोळींसह रमेश जारकीहोळी यांचे गुरु एकच आहेत, असे नलीनकुमार कटील यांनी पुनश्च स्पष्ट केले. आगामी निवडणुकीमध्ये बेळगावातील 18 जागा आम्ही जिंकू. तसेच राज्यात 150 जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे असे सांगून डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडण्याचा संकल्प रमेश जारकीहोळी यांनी केला असल्याची माहितीही कटील यांनी यावेळी दिली.