शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळाची आवड असणाऱ्या क्रीडाप्रेमी कुटुंबात जन्मलेला विश्वंभर कोलेकर हा युवा धावपटू सध्या क्रीडा क्षेत्रात चमकत आहे. वडिलांचा आदर्श आणि मोठ्या बहिणीच्या यशाला आपल्या जीवनाची प्रेरणा मानून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेळगावच्या विश्वंभर कोलेकर याने गेल्या 12 वर्षांपासून नैऋत्य रेल्वेला सातत्याने सुवर्ण पदकं मिळवून दिली असून आता तो आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे नांव उज्वल करण्यास सज्ज झाला आहे.
विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील विश्वंभर कोलेकर याने विद्यापीठ ते राज्य पातळीवर धावण्याच्या शर्यतीत अनेक विक्रम केले आहेत. विश्वंभरचे वडील लक्ष्मण कोलेकर हे एकेकाळचे मातब्बर कबड्डीपटू आणि राज्याचे उत्कृष्ट खो -खो प्रशिक्षक आहेत. मोठी बहीण ज्योती कोलेकर ही धावपटू आहे. एका बहिणीने कर्नाटकला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला तर दुसरी बहीण राज्यस्तरीय खो खो खेळाडू आहे. अशा प्रकारे विविध खेळाडूंनी भरलेल्या कुटुंबात विश्वंभर लहानाचा मोठा झाला.
विश्वंभराचे वडील क्रीडा प्रशिक्षक म्हणून सेवा बजावीत होते. पुढे त्यांनी आपल्या खेळाडू मुलांसाठी खानापुर येथून शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तीनही मुलांना आपल्या वडिलांकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. लहानपणी मोठ्या बहिणीसोबत सराव करत धावपटू बनलेल्या विश्वंभराने कर्नाटक विद्यापीठात सुवर्णपदक मिळविले. अंगभूत क्रीडा कौशल्यामुळे पदवीचे शिक्षण घेतानाच त्याला रेल्वेत नोकरी मिळाली. वयाच्या 10 व्या वर्षी धावायला सुरुवात केलेला विश्वंभर आज 30 वर्षांचा आहे. मातब्बर धावपटू म्हणून विद्यापीठस्तरावर सुरु झालेला त्याचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविण्याच्या टप्प्यावर आला आहे.
विश्वंभराची मोठी बहीण ज्योती हिने कर्नाटकसाठी राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकले असून ती देखील रेल्वे खात्यात नोकरी करत आहे. विश्वंभरची दुसरी बहीण मिलन ही राज्यस्तरीय खो -खो खेळाडू म्हणून नावारूपास आली आहे. विश्वंभरने राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन केले असून सध्या तो दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये डेप्युटी टीसी म्हणून कार्यरत आहे.
वयाच्या 10 व्या वर्षापासून 800 आणि 1500 मी. शर्यत धावण्यास सुरुवात करणाऱ्या विश्वंभराने आतापर्यंत 50 हून अधिक पदके जिंकली आहेत. यामध्ये बऱ्याच सुवर्ण पदकाचा समावेश आहे. रेल्वेमध्ये रुजू होण्यापूर्वी कर्नाटकसाठी अनेक राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. रेल्वेमध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या अखिल भारतीय आंतर रेल्वे ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे. तथापि इतर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर कर्नाटकचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकणे ही अभिमानाची बाब असल्याचे विश्वंभर सांगतो.
विश्वंभरने आतापर्यंत 12 क्रीडा स्पर्धांमध्ये 12 सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय रेल्वेच्या क्रीडा इतिहासातील ही एक विशेष कामगिरी आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे चॅम्पियनशिपमध्ये विश्वंभरला दुखापतीमुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी त्याने कोलकाता येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या जागतिक रेल्वे ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना विश्वंभरने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून देशाचे नाव उंचावले आहे.
कर्नाटकचे ज्येष्ठ खेळाडू, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, आणि भारतीय पॅरालिम्पिक प्रशिक्षक के. सत्यनारायण यांचा विक्रम 2017 च्या राज्य ऑलिम्पिकमध्ये विश्वंभरने मोडला. मागील 32 वर्षांचा हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विश्वंभर कोलेकर माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक अयप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकणे हे आपले सध्या मुख्य ध्येय असल्याचे विश्वंभर सांगतो.