अनंत चतुर्दशी दिवशी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होऊन 15 दिवस उलटल्यानंतर आता जक्केरी होंड तलावातील बाप्पाच्या विसर्जित मूर्तींचे रंग उडालेले दयनीय स्थितीतील अवशेष उघड्यावर पडल्यामुळे भाविकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या अवशेषांची तात्काळ उचल करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी शहरातील विसर्जन तलावांमध्ये गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन केलेल्याला आज 17 दिवस झाले आहेत. दरवर्षी श्री विसर्जनानंतर अल्पावधीत महापालिकेकडून या तलावांमधील मूर्तींचे अवशेष बाहेर काढून त्यांचा योग्य प्रकारे निचरा केला जातो.
मात्र यावेळी अद्याप जक्केरी होंड तलावातील विसर्जित मूर्तींचे अवशेष बाहेर काढण्यात आलेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी या तलावातील पाण्याचा उपसा करून तो रिकामी करण्यात आला आहे. मात्र अजून तलावातील श्री मूर्तींच्या अवशेषांची उचल करण्यात आलेली नाही.
त्यामुळे तलावात उघड्यावर इतस्तत: पडलेले बाप्पाच्या मूर्तींचे मोडके तोडके, रंग उडालेल्या दयनीय अवस्थेतील अवशेषांचे दृश्य गणेश भक्तांच्या मनाला वेदना देणारे ठरत आहेत. तरी लोकप्रतिनिधी आणि हा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन जक्केरी होंड तलावातील मूर्तींच्या अवशेषांची तात्काळ उचल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत.
त्याचप्रमाणे येथील ओसंडून वाहणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या कचराकुंडाकडेही लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.