ऑटोरिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा मीटरने सुसज्ज असणे आवश्यक आहे. मीटर बसवल्यानंतरच भाडेदरात सुधारणा करून योग्य तो दर निश्चित केला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. बुधवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
ऑटोरिक्षाचे सध्याचे किमान भाडे 25 रुपये प्रति 1.5 कि.मी. आहे. मात्र काही रिक्षावाले जादा दर आकारून जनतेची पिळवणूक करत आहेत.अशा ऑटोरिक्षा जप्त करून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.अवाजवी रिक्षा भाडे संदर्भात नागरिकांकडून दररोज अनेक तक्रारी येत आहेत.
अवघ्या दीड कि.मी.साठी ऑटोरिक्षाचालक 150 ते 200 रुपये भाडे घेत आहेत.रात्री प्रवास करणारे लोक ऑटोरिक्षाचे भाडे ऐकून चक्रावून जात आहेत. अशा प्रकारे खंडणीखोरी आढळून आल्यास ऑटो जप्त करून चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येईल, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
ऑटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या सदस्य चालकांना नोटीस द्यावी.मीटर बसविण्याबाबत आॅटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित माहिती दिल्यासच सुधारित दर निश्चित केले जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी स्नेहा पी.व्ही., रस्ते वाहतूक अधिकारी एस. बी मगदुम्, बैठकीस ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.