हे माणसा तुझा माझ्यावर भरवसा नाय काय,असे म्हणण्याची वेळ जणू खड्डेमय रस्त्यामुळे आली आहे. रस्तेमय खड्ड्यांचे भाग्य उजळण्याची कोणतीच शक्यता दिसत नसून जीवघेण्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहने चालविताना जीवाचा भरोसाच राहिलेला नाही.
पावसाळा संपत आला तरीही अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याबाबत कोणतीच प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच मनपाला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
बहुतांशी शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रमुख रस्त्यांबरोबरच गल्लोगल्ली मधील रस्ते देखील मृत्यूचे सापळे बनले आहेत यामुळे स्मार्ट सिटी म्हणून वाटचाल असणाऱ्या शहरात रस्ते मात्र दुरावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. खड्डे चुकविण्यात जाऊन होणारे किरकोळ अपघात तसेच वाहन चालकांना करावी लागणारी कसरत दररोजचीच आहे.यामुळे महापालिका रस्त्यांच्या सुधारणेबाबत केव्हा जागी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरी सुविधांमध्ये प्रामुख्याने दर्जेदार रस्ते ही महत्त्वपूर्ण बाब आहे.मात्र रस्त्यांच्या विकासाबाबत होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या समस्येमध्ये भर घालत आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे यामुळे बेळगाव शहर स्मार्ट सिटी म्हणून गणले जात आहे मात्र रस्ते स्मार्ट करण्याकडे दुर्लक्ष होत आहे शिवाय रस्ते सुव्यवस्थेत राखण्यासाठी आवश्यक असणारे रस्त्यांचे दर्जेदार काम देखील होत नसल्यामुळे बहुतांशी रस्ते सातत्याने खड्डेमय बनताना दिसत आहेत.यामुळे रस्त्यांची पाहणी करून दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांबाबत प्रमुख भूमिका राबवणे गरजेचे बनले आहे.