शाळा परिसरातील रस्त्यावर विद्यार्थ्यांचा बळी गेल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडल्या असून त्यावर उपाय म्हणून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा आवारात, शालेय वेळेत वाहतूक नियमनासाठी खाजगी सुरक्षारक्षक किंवा होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर नागमोडी पद्धतीने बॅरिकेड्स लावावेत यासह अनेक सूचना शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिल्या.
पोलीस तसेच विविध खात्यातर्फे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्व शाळांना शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कॉन्स्टेबल पुरविणे शक्य नाही.
त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी घरातून निघण्यापासून ते शाळेत पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, शिक्षण संस्थांनी खासगी सुरक्षा रक्षक किंवा होमगार्डची नियुक्ती करावी अशी सूचना दिली.
सदर होमगार्ड्स किंवा सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच वाहतूक व्यवस्था हाताळण्यासंदर्भात माहितीही दिली जाईल, असे शहर पोलीस आयुक्तांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हि सर्वांची आहे त्यामुळे सर्वांनी याचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावर गतिरोधक घालून कोणतेही अपघात टाळता येत नाहीत, ज्या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या आहे त्यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी, शाळा व्यवस्थापनाने शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत नागमोडी आकारात बॅरिकेड्स लावावे, जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे.
शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पार्किंगची समस्या यामुळे निर्माण झाली असून रिंगरोड नसल्याने अवजड वाहने शहराबाहेरून वाळविणे अवघड झाले आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.