पशु संगोपन खात्यातर्फे आता ॲनिमल डिजिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम (एडीआयएस) अंमलात आणली जात असून यामुळे जनावरांना त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख मिळणार आहे.
प्रत्येक गुराचे अथवा घोडा किंवा शेळीचे पावलाचे ठसे आणि स्कॅन केलेले नाक एकमेकांपेक्षा भिन्न असते, ज्याला मझल कोड म्हंटले जाते. पाळीव गुरे किंवा घोड्यांसारख्या प्राण्यांची आता एडीआयएस टीपीएल रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी केली जात आहे. ही नोंदणी करताना जनावराच्या मालकाचे नांव, जनावराची जन्मतारीख, आरोग्याची समस्या, त्याची जात, त्याचे केंव्हा लसीकरण झाले वगैरे माहिती एडीआयएसच्या डाटा बँकमध्ये भरावी लागते.
त्यानंतर जेंव्हा कधी एखाद्याला नोंदणीकृत प्राण्याची माहिती हवी असेल तेव्हा तो किंवा ती व्यक्ती मझल कोड स्कॅन करून संबंधित प्राण्याची सर्व माहिती मिळवू शकतात. थोडक्यात विमा उतरवण्यासाठी एखाद्या प्राण्याच्या कानावर अथवा शरीराच्या सोयीस्कर भागावर क्लिप टॅग करण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. कारण मझल कोड आता प्राण्याला कोणतीही दुखापत न करता त्याचा विमा उतरवण्याचे काम करत आहे.
एडीआयएस रजिस्ट्रेशनमुळे मालकाला जनावरांच्या आरोग्य संबंधीच्या समस्यांचा पाठपुरावा करता येऊ शकतो, लसीकरणाची पूर्वसूचना मिळते, गर्भधारणेची लक्षणे कळतात वगैरे सुविधा उपलब्ध होतात. एडीआयएस टीपीएलच्या माध्यमातून ऑनलाइन पडताळणीसह जनावर खरेदी -विक्री सुविधा उपलब्ध आहे.
एडीआयएस टीपीएल प्रणाली शेतकऱ्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली असून एडीआयएस टीपीएल रजिस्ट्रेशन विनाशुल्क करून दिले जाते हे विशेष होय. कुत्री -मांजरांचा अद्याप एडीआयएस यादीत समावेश नसला तरी त्यांना देखील एडीआयएस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे.