दसरा -नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरात मोठ्या जल्लोषात श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जात आहे. विशेष म्हणजे या दौडला पोलीस प्रशासन देखील समरसून साथ देत आहे.
याची प्रचिती आज शिवभक्तांना आली जेंव्हा खुद्द सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) नारायण बरमनी यांनी स्वतः ऑटोरिक्षा चालवत दौडमध्ये सहभाग दर्शविला.
दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे बेळगाव शहरात श्री दुर्गामाता दौडचे भव्य प्रमाणात आयोजन केले जात आहे. बंदोबस्ताच्या निमित्ताने दुर्गामाता दौडमध्ये पोलीस देखील सहभागी होत आहेत. दौंडमध्ये धारकरी आणि शिवभक्तांसमवेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी धावत असल्याचे चित्र सध्या रोज सकाळी पहावयास मिळत आहे. वडगाव परिसरात आज शुक्रवारी सकाळी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
या दौडमध्ये नेहमीप्रमाणे शेकडो शिवभक्तांनी सहभाग दर्शविला होता. ही दौड लक्षवेधी ठरली असली तरी या दौंड दरम्यान एसीपी नारायण बर्मनी कुतूहलाचा विषय बनले होते.
श्री दुर्गामाता दौड सुरळीत शांततेने पार पडावी यासाठी बंदोबस्ता करिता पोलिसांना दौड सोबत धावावे लागते. एएसआय, पीएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश असतो. मात्र आज प्रथमच नारायण बरमनी यांच्या स्वरूपात सहाय्यक पोलीस आयुक्त यासारख्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाला होता हे विशेष होय.
दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज असलेली ऑटोरिक्षा चालवत एसीपी बरमनी यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. नारायण बरमनी यांचा सारखा कडक शिस्तीचा वरिष्ठ पोलिस अधिकारी चक्क रिक्षा चालवत असताना पाहणे हा आज सकाळी वडगावमध्ये एक कुतूहलाचा विषय झाला होता.