दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी टिळक चौक येथे ” अखंड हिंदुस्थान संकल्प दिनाचे ” आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता आयोजित केलेल्या या सभेला युवकांनी तुफान गर्दी केली होती.
श्री कालीपूत्र कालिचरण महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हि सभा पार पडली. यावेळी हिंदुत्वावर श्री कालिचरण महाराजांनी युवकांना संबोधित केले. हिंदुत्वनिष्ट युवकांना आपल्या घनाघाती प्रखर भाषणात हिंदुच्या गुण दोषावर भाष्य करित, अखंड हिंदुस्थानाचा संकल्प बोलून दाखविला. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, भारताचे विभाजन केवळ १९४७ मध्ये झालेले नसून, विश्वभर हिंदूचे असलेले साम्राज्य अनेक नव नविन देशाच्या खंडित झालेल्या स्थितीत आहे. भारतभूमीच्या रक्षणार्थ तसेच गतकाळातील वैभव संपन्न हिंदुस्थान निर्मितीसाठी हिंदुत्वनिष्ट, कट्टर हिंदूत्ववादी नेता, आमदार, खासदार निवडून आणलाच पाहिजे , असे आव्हान श्री कालीपुत्र कालीचरण महाराजांनी केले. अखंड भारताची संकल्पना समजून घेऊन भारतातील हिंदुत्व सातासमुद्रापलीकडे नेऊन जगावर अधिराज्य करणे हा उद्देश आणि दृष्टिकोन प्रत्येक हिंदूंनी ठेवावा, असे आवाहनदेखील स्वामीजींनी केले.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनीही आपले विचार व्यक्त करत हिंदुत्वासाठी प्रत्येकाने साम, दाम, दंड, भेद यानुसार कार्यरत राहण्याचे आवाहन केले. आपल्या संघटनेतील कार्यकर्ते हे बिकाऊ नसून ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे सांगत कोणावर अन्याय न करता आणि आपल्यावरील अन्याय न सहन करता अखंडपणे हिंदुत्वासाठी कार्य करावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. खुर्चीतील अरेरावी हिंदू कार्यकर्ता कदापिही सहन करणार नसून हिंदुत्वावर जर संकट आले तर सर्व बंधने झुगारून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनदेखील रमाकांत कोंडुस्कर यांनी कार्यकर्त्यांना केले.
या सभेत श्री मंजुनाथ स्वामींचेही समयोचित भाषण झाले. या कार्यक्रमात निवृत्त सैनिक , हौतात्म्य पत्करलेल्या वीर सैनिकाच्या वीर पत्नी- मातांचा सत्कार करण्यात आला. कुस्तीत तसेच अपंग असुन ही जलतरण राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या क्रीडापटुंचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र यंदा पावसाची रिपरिप सुरु असूनही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थिती दर्शविली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे बेळगाव महानगर अध्यक्ष श्रीकांत कुऱ्याळकर , तालुकाध्यक्ष भरत पाटील, निलजी, बेळगाव महानगर- तालुका पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.