बेळगाव लाईव्ह विशेष : घड्याळाचे काटे नेहमीच गोल फिरतात.. मात्र गेलेली वेळ कधीच येत नाही.. आणि वेळ गेल्यानंतर राहतात त्या आठवणी! अशा असंख्य आठवणींना नजरकैद करून आठवणी जिवंत ठेवणारा अवलिया म्हणजे छायाचित्रकार! १८३९ मध्ये छायाचित्रणाची सुरुवात झाली आणि फ्रान्स या देशाने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली आणि आजतागायत १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिनाच्या रूपाने साजरा केला जाऊ लागला.
अनेक वर्षांपूर्वी सुरु झालेले छायाचित्रण आजही तितक्याच ‘क्रेझ’मध्ये आहे! काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात येण्यासाठी बराच कालावधी वाट पाहण्यात जायचा. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमे बदलत गेली. रोल कॅमेरा, डिजिटल कॅमेरा आणि आता तर थेट प्रत्येकाच्या हातातील मोबाइलमध्येही कॅमेरा… काळ, वेळ आणि संकल्पना जरी बदलल्या तरी आजही प्रत्येकामध्ये फोटोग्राफीची हौस मात्र तशीच आहे. आता जमाना पूर्वीसारखा नाही राहिला. लग्न समारंभ किंवा अतिशय महत्वाच्या कार्यक्रमप्रसंगी काढले जाणारे फोटोज आता इव्हेन्ट बनत चालले आहेत.
प्री-वेडिंग, पोस्ट वेडिंग, मॅटर्निटी फोटोशूट, बेबी शॉवर आणि बेबी फोटो शूट, फॅशनशूट, फॅमिली फोटोशूट, सणावाराला त्या त्या वेषभूषेप्रमाणे थीम बेस्ड फोटोशूट असे असंख्य प्रकार हल्ली फोटोशूटमध्ये पाहायला मिळतात. हल्ली अनेक तरुण तरुणी केवळ फोटोग्राफीसाठी तासनतास वेळ काढून भटकंती करतात. काही हौशी कलाकार तर वोट्सअप, फेसबुक वर अपलोड करण्यासाठी केवळ फोटोशूट करतात.
व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांच्या दोनच संकल्पना आधी छायाचित्र जगातला माहित होत्या. मात्र आता आलेल्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येकजण फोटोग्राफीचे वेड बाळगत आहे. अनेकवेळा अतिहौशी छायाचित्रकारांकडून संवेदनाहीन आणि माणुसकी सोडून छायाचित्रण केले जाते. हि बाब देखील आजच्या छायाचित्रण जगतासाठी नुकसानकारक आहे.
फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.
जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते! छायाचित्रकार म्हणजे क्षुल्लक दृश्यही बोलके करण्याची कला जपणारा अवलिया! अशा या जागतिक छायाचित्र दिनी सर्व छायाचित्रकारांना ‘बेळगाव लाईव्ह’च्या खूप खूप शुभेच्छा!