रखडलेल्या विकास कामांमुळे बेळगाव शहराची ‘स्मार्ट सिटी’ मध्ये परिवर्तन होण्याच्या दिशेने अतिशय संथ कासवगतीने वाटचाल सुरू आहे. अयोध्यानगर मंडोळी रोड या ठिकाणी सुरू असलेले ड्रेनेजचे काम स्मार्ट सिटी की महापालिकेचे? या वादात अडकल्यापासून गेली दीड वर्षे ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना ड्रेनेजच्या या अर्धवट कामाचा मोठा मनस्ताप होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
अयोध्यानगर स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे करण्यात येत आहेत. सदर कामांबरोबरच या ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर काम अनेक दिवसांपासून तसेच अर्धवट अवस्थेत पडले आहे. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच पावसामुळे चिखलाच्या दलदलीसह अस्वच्छता निर्माण झाली आहे.
ड्रेनेजचे हे विकास काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सातत्याने केल्या जाणाऱ्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत येते की महापालिका अंतर्गत? या वादामुळे हे काम रखडल्याचे समजते. मात्र प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील जवळपास दीड वर्षापासून सदर काम रखडले असून या ठिकाणी बांधकामाचे कामाचे सर्व साहित्य बेवारस अवस्थेत पडून आहे. चिंतेची बाब ही की ड्रेनेज बांधकामासाठी बसवण्यात आलेले लोखंडी बार देखील तसेच उघड्यावर आहेत. प्राचार्य आणि दुचाकी वाहन चालकांसाठी हे बार जीव घेणे ठरण्याची शक्यता आहे. मंडोळी रोडवर दीड दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीच्या अर्धवट अवस्थेतील गटारात कोसळल्याने लोखंडी बार मानेत शिरून एका सायकल स्वाराचा मृत्यू झाला होता.
अलीकडे बऱ्याच वेळा संबंधित ठिकाणी अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरी मंडोळी रोडवर आणखी एकाचा बळी जाण्याची वाट न राहता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सदर अर्धवट अवस्थेतील विकास काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.