बेळगाव शहर परिसरात वावणाऱ्या बिबट्यावर 24 तास पाळत ठेवून येत्या दोन-तीन दिवसात त्याला पकडण्याची सक्त सूचना आपण वनखात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती वनखात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
शहरात आज सोमवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 16 दिवसापासून बेळगाव शहर परिसरात ठाण मांडून असलेल्या बिबट्याचे आज सकाळी पुन्हा दर्शन झाले. बिबट्याने वनखात्याला चकमा देऊन पलायन केल्यानंतर वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती तातडीने बेळगाव दाखल झाले.
बेळगाव येताच त्यांनी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या समवेत तातडीने बेळगावचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी(सीसीएफ) मंजुनाथ चौहान आणि पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री उमेश कत्ती यांनी बिबट्या संदर्भात एकंदर परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती जाणून घेऊन आवश्यक सूचना केल्या.
सदर बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वनखात्याचे मंत्री उमेश कत्ती म्हणाले की, गेल्या 20 दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात चार बिबट्यांचा वावर आहे. विशेषता बेळगाव रेस कोर्स मैदानाच्या ठिकाणी जो बिबटा आहे त्याला पकडण्यासाठी तज्ञ लोकांना पाचारण केले जाईल आणि येत्या दोन ते तीन दिवसात त्या बिबट्याला पकडण्यात येईल. त्या अनुषंगाने पोलीस व वनकर्मचाऱ्यांची कुमक वाढवून 24 तास बिबट्यावर पाळत ठेवण्याचा आदेश मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

तुम्ही म्हणता म्हणून बिबट्याला पकडणे सोपे नाही. ते काही कुत्र्याचे पिल्लू नाही तो जवळपास 4 वर्षाचा पूर्ण वाढ झालेला बिबटा आहे. बिबट्याला पकडण्यासाठी प्रशिक्षित हत्तींसह बंदुकीद्वारे गुंगीचे इंजेक्शन (ट्रॅक्युलायझर) देणाऱ्या आणखी दोघा तज्ञ शार्प शूटर्सना म्हैसूर येथून पाचारण करण्यात आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठीच्या जाळ्यांची संख्या वाढवण्यास सांगितली आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
मानवी वसाहतीत शिरलेल्या या बिबट्याने सुदैवाने अद्यापपर्यंत मनुष्यावर हल्ला केलेला नाही आणि बिबटे मानव वसाहतीत येण्याची ही कांही पहिली घटना नाही. बेळगाव शहरात मात्र पहिल्यांदाच तसा प्रकार घडत आहे असे सांगून जिल्ह्यात बिबटे वारंवार का येत आहेत? या पत्रकारांच्या प्रश्नाला मी वनखात्याचा मंत्री असल्यामुळे ते मला भेटायला येतात, असे मिस्कील उत्तरही मंत्री उमेश कत्ती यांनी दिले.