बेळगाव लाईव्ह विशेष : बेसुमार वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि स्वतःच्या सोयोसाठी जंगलांचा होत असलेला ऱ्हास.. यामुळे वन्यजीव जंगल सोडून मानवी वस्तीकडे वळत आहेत. याचाच प्रत्यय आता बेळगावकरांना येत आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी बेळगावमधील गोल्फ कोर्स मैदानाजवळील जाधव नगर येथे तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर वनविभाग तत्परतेने कामाला लागला आहे.
आठवडाभर मिशन बिबट्या शोध मोहीम विविध कल्पना लढवून करण्यात येत आहे. वनविभागाचे कर्मचारी अनेक शक्कल लढवून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. हि शोध मोहीम गेला आठवडाभर रात्रंदिवस सुरु असून आता बाळेकुंद्रीनजीक असलेल्या मोदगा या गावात हायना हा प्राणी दिसून आला आहे.
याचा व्हिडीओ शहरात दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांकडे वाढलेला कल हा चिंताजनक आहे.
वन्यजीव मानवी वस्तींकडे येण्यामागे दोन कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येनुसार मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात केलेले अतिक्रमण, अनियोजित लोकवस्ती आणि दुसरे कारण म्हणजे अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेले वन्यजीव! यातील पहिले कारण हे विचारजन्य आहे. यापूर्वी केवळ बिबट्या मानवी वस्तीत येऊन काळजाचा ठोका चुकायचा मात्र आता एका मागोमाग एक असे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत.
खानापूर परिसरात सर्वाधिक वनक्षेत्र असून या भागात यापूर्वी बिबट्या, गवा यासह इतर वन्यजीव आढळून आले आहेत. जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावालगत असे प्राणी आढळून येणे शक्य आहे. मात्र आता या वन्यप्राण्यांनी शहराच्या दिशेने आपला मोर्चा वळविला आहे, हि बाब विचार करण्याजोगी आहे.
विकासाच्या नावाखाली वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले असून महामार्ग आणि रेल्वे मार्गांच्या विकासासाठी अधिकाधिक वनविभागाची जमीन व्यापली जात आहे. वनविभागात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी केवळ मानवी वस्तीच्या दिशेने येत नसून असे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, हे देखील तितकेच खरे आहे. या समस्येसाठी केवळ या भागात राहणारे नागरिकच जबाबदार नाहीत तर यासाठी संस्थात्मक, प्रशासनात्मक अपयश देखील तितकेच जबाबदार आहे.
वन्यजीवांसंदर्भात वाढत चाललेली अनास्था हि मानवी जातीसाठी धोक्याची घंटा आहे. पर्यावरण पूरक कामे, उपक्रम हे केवळ भोंगळ आणि प्रसिद्धीसाठी न करता यावर प्रत्येकाने गांभीर्याने विचार करून कृती करणे आवश्यक आहे. अन्यथा वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवाने हस्तक्षेप केल्यास वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील ‘सर्जिकल स्ट्राईक’ अटळ आहे.
बिबट्या नंतर शुक्रवारी भूतरामहट्टी गावांत हा प्राणी आला होता… pic.twitter.com/TT3wlPkznb
— Belgaumlive (@belgaumlive) August 12, 2022