श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी ऐन हंगामात असून ऐन सणासुदीच्या काळात भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत. बहुतांशी हिंदू लोक श्रावण महिन्यात मांसाहार टाळतात. या काळात विविध प्रकारचा भाजीपालाही बाजारात दाखल होतो. मात्र परंतु श्रावण आणि गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भाजीपाला खरेदी करताना वधारलेल्या दरांमुळे गृहणीचे बजेट कोलमडले आहे.
बेळगावमध्ये सध्या खाजगी आणि सरकारी अशी दोन्ही भाजीमार्केट सुरु असून या दोन्ही भाजीमार्केटमध्ये होणारी आवक पाहता भाजीपाल्याचे दर कमी होणे अपेक्षित होते. मात्र बाजारातील घाऊक तसेच किरकोळ भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ हि सर्वसामान्यांना झटका देणारी ठरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने आवक मंदावल्याचीही चिन्हे आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर पुन्हा वधारले असून येत्या काळात भाजीपाल्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
वाढत्या महागाईच्या झळा सोसत असतानाच दूध, दैनंदिन गरजेच्या वस्तू, धान्य यासह आता भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ हि सर्वसामान्यांच्या डोईजड ठरत आहे. बेळगाव भाजीमार्केटमध्ये सध्या कोथिंबीरीचे दर वधारले असून ३५ ते ३० रुपयांना एक जुडी कोथिंबीर उपलब्ध होत आहे. बिनीस, मटार, श्रावनशेंगा, वांगी, तुपशेंगा, वाली, भेंडी, दोडकी यासह इतर अनेक फळभाज्या ६० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहेत.
तर मेथीचे दर मात्र सर्वात अधिक आहेत. घाऊक भाजीमार्केटमध्येच मेथीचे प्रति जुडीचे दर २० रुपये प्रति जुडी असे आहेत. टोमॅटो २० रुपये प्रतिकिलो, गाजर ४० ते ५० रुपये प्रतिकिलो, मिरची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो, बटाटे ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, काकडी ४०-५० रुपये प्रतिकिलो अशा दरात सध्या भाजीपाला उपलब्ध आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादन घातल्याने आवक कमी होण्याची शक्यता आहे. एकीकडे इंधन दरवाढीत होरपळून जाणारी जनता आता दुसऱ्या बाजूनेही महागाईच्या झळा सोसत असून आता ऐन सणासुदीच्या दिवसात जनतेला भाजीपाल्यासाठी जास्तीचा खिसा रिकामा करावा लागणार आहे.