कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या तीन पॅसेंजर रेल्वे येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा रुळावर धावू लागणार असल्याने बेळगाव -शेडबाळ -बेळगाव ही रेल्वे 26 ऑगस्टपासून दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा निर्णय नैऋत्य रेल्वेने घेतला आहे.
नैऋत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्र. 17332 व 17331 हुबळी -मिरज -हुबळी, रेल्वे क्र. 17333 व 17334 ही मिरज -कॅसलरॉक -मिरज आणि रेल्वे क्र. 07351 व 07352 ही मिरज -लोंढा -मिरज अशा तीनही रेल्वे येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहेत.
त्यामुळे बेळगाव -मिरज मार्गावर सुरू असलेली रेल्वे क्र. 07335 व 07336 बेळगाव -शेडबाळ -बेळगाव ही रेल्वे बंद होणार आहे. या रेल्वेच्या प्रवाशांना उपरोक्त तीन रेल्वेंचा लाभ घेता येणार आहे.
कोरोनामुळे मार्च 2020 पासून हुबळी -मिरज मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद होती. प्रवाशांच्या मागणीनंतर बेळगाव -शेडबाळ -बेळगाव अशी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. कांही कारणास्तव अनेकदा ही रेल्वे बंद करण्यात येत होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत होता.
मात्र आता तीन पॅसेंजर रेल्वे एकाच मार्गावरून सुरू होणार असल्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे या तीनही रेल्वे कायम सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली जात आहे.