वाहतुकीचा बोजवारा आणि यामुळे निर्माण होणारी समस्या ही बेळगावकरांसाठी नेहमीचीच बाब आहे.मात्र बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या जांबोटी चोरला मार्गावर देखील सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे शनिवारी देखील चोरला घाटातून जाणाऱ्या पेटणे ते कणकुंबी या मार्गावर सकाळच्या वेळी टँकर बंद पडल्याने दोन ते तीन तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी विविध कामासाठी गोव्याला जाणाऱ्या वाहतूकधारकांना याचा फटका बसला.
मागील पंधरवड्यात देखील या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले होते मात्र पुन्हा एकदा हाच अनुभव आला आहे. शनिवारी सकाळी सदर घटना घडली असून डिझेल घेऊन जाणारा टँकर अचानक बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नेमके काय झाले हे समजण्याच्या आतच वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी अनेक वाहनधारकांनी घटनेची माहिती मिळताच पर्यायी मार्गे हेमडगा वरून गोव्याला पोहोचण्यासाठी वाहने वळवली.
गोव्याला जाणारा चोरला मार्ग महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी चार चाकी दुचाकी वाहनांबरोबरच मालवाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते. मात्र अशा प्रकारे मोठे वाहन बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
या ठिकाणी मोबाईल ला रेंज नसल्याने फोनवरून संपर्क साधून तात्काळ वाहन दुरुस्तीसाठी प्रयत्न करणे देखील कठीण झाले होते परिणामी दोन ते तीन तास वाहने एका ठिकाणीच थांबून होती या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.