स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बेळगावमध्ये नरगुंदकर भावे चौक आणि टिळकचौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाची तयारी 14 ऑगस्ट रोजी दुपारपासूनच करण्यात येते. यामुळे रस्त्याच्या मध्यभागी व्यासपीठ उभारण्यासाठी देखील तयारी करण्यात येते. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळविण्यात येते. परिणामी आज दुपारनंतर बेळगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी झालेली दिसून आली.
श्रावण महिन्यात बहुतांशी घरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच 15 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे खरेदीसाठीही नागरिकांची मोठी गर्दी आज होती.
खडेबाजार कॉर्नर पासून गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, कांदा मार्केट या परिसरात भाजी खरेदी आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होती. नारगुंदकर भावे चौकात देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामुळे नरगुंदकर भावे चौकात देखील मोठी गर्दी होती.
रविवार हा सुट्टीचा दिवस त्यातच श्रावण मासातील पूजा विधी, अवघ्या 15-20 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि यासाठी खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक. हा सारा ताळमेळ पाहता आज दिवसभर बेळगाव शहर वाहतुकीमुळे ब्लॉक झाले होते. कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज, रिमझिम पाऊस आणि वाहतुकीची कोंडी यामुळे आजचा संडे हा पूर्णपणे गजबजलेला दिसून आला.