येळ्ळूर हे बेळगाव तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूर गावात रात्रीच्या वस्ती साठी एकही बस नाही. ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत त्याशिवाय या बसेस मिनी बस आहेत त्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होते. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा देखील नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विध्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
येळ्ळूर गावाचा विस्तार मोठा असल्याने साहजिकच गावातून जवळजवळ एक हजार शाळा कॉलेजेस चे विद्यार्थी रोज जात असतात. मध्ये सकाळी 6:00, 6:30, 7:30 , या वेळेत आरपीडी, गोगटे, आरएलएस, जी.एस.एस तसेच इतर शाळा कॉलेजेसना जाणारे विद्यार्थी आहेत पण गावात वस्तीची एकही बस सोडली जात नसल्याने सकाळी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो. तसेच 8:30, 9:00, 9:30,10:00, 10:30 या वेळेत मराठा मंडळ, ज्योती कॉलेज जैन कॉलेज मजगाव आयटीआय कॉलेज आणि इतर शाळा कॉलेजेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी या बसेस वेळेत असणे सोयीस्कर गरजेचे आहे.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसी, डिस्ट्रिक्ट ट्राफिक ऑफिसर के एम सिंह के. लमानी आणि डेपो मॅनेजर ए. वाय. शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले.
येळ्ळूर पंचायतीने निवेदनात म्हटले आहे की येळ्ळूर गावासाठी वस्तीसाठी बस सोडण्यात यावी तसेच इतर बसेसही वेळेवर सोडाव्यात. या निवेदनाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास आम्ही पुढील कार्यवाही करु.
निवेदन देतेवेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, पिंटू चौगुले, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, तानाजी पाटील, शालन पाटील, वनिता परीट, रूपा पुण्यानावर, अनुसया परीट, मनीषा घाडी, सोनाली येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.