शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गुरुवारी सामूहिक सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्णपणे मोफत आणि सामुदायिक स्वरूपातील या कार्यक्रमात बेळगाव शहर आणि परिसरातील तसेच शांताई वृद्धाश्रमातील असे एकत्रित 81 जण सहभागी झाले होते. वयाच्या 80 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या अर्थात 1000 पौर्णिमा जीवनात पाहिलेल्या व्यक्तींना या सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ देण्यात आला .
बेळगाव येथील पुरोहित वामन भटजी आणि त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमासाठीचे विधिवत पूजन होम हवन आणि इतर सर्व विधी पूर्ण केल्या.शांताईचे चेअरमन विजय पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठ दिवसांपूर्वी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव शहर आणि परिसरातील 80 वर्षे पूर्ण केलेल्या वृद्ध मंडळींना करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन 80 वर्षापासून 105 वर्षापर्यंतचा टप्पा पार केलेल्या तब्बल 81 जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित वयोवृद्ध मंडळींसाठी संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत शिक्षक आणि संगीताचे अभ्यासक शंकर पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांच्या समूहातील महिला सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन वृद्ध व्यक्तींचे मनोरंजन केले. शंकर पाटील हे वारंवार शांताई वृद्धाश्रमामध्ये संगीताचे कार्यक्रम आयोजित करून आजी आजोबांचे मनोरंजन करत असतात.
महाद्वार रोड परिसरातून सामाजिक कार्यकर्त्या प्रेमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गुरुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वृद्ध सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात सहभागी सर्व वयोवृद्ध मंडळींना देणगीदार आणि शांताईच्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष विजय मोरे, अध्यक्ष विजय पाटील, नागेश पाटील, भगवान वाळवेकर, संतोष ममदापूर, विष्णू रायबागी आदींसह इतर मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. ज्यांच्या प्रेरणेतून आश्रमाची उभारणी झाली त्या शांताई पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शांताई च्या प्रांगणात आनंदोत्सव निर्माण झाला होता.
राजश्री रायबागी आणि महावीर रायबागी यांनी पूजेमध्ये सहभाग घेतला होता.निवृत्त्ती चिकोर्डे यांचाही गायन कार्यक्रम झाला.अनुराधा वाळवेकर आणि गणपतराव साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घडवून आणण्यात आला यावेळी गणपतराव साळुंखे यांनी दरवर्षी या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 51000 रुपयांची देणगी दिली.मारिया मोरे,विजया पाटील,माधवी पाटील, माया रायबागी, नगरसेवक नंदू मिरजकर, अरुण पोटे,सूरज गवळी, नागेश चौगुले, रेखा बाळेकुंद्री आदींनी विशेष परिश्रम घेतले. शांताईवर प्रेम करणारी असंख्य मंडळी या कार्यक्रमात उपस्थित राहिली.