कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील मराठा समाजातील बेरोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी श्री शहाजीराजे समृद्धी योजना तसेच स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजने अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील मराठा समाजातील लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ करून घ्यावा, अशी असे आवाहन माजी आमदार मनोहर कडोलकर यांनी केले आहे.
बेळगावात अखिल भारतीय मराठा फेडरेशनच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी फेडरेशनचे राज्यसचिव विठ्ठल वाघमोडे (निपाणी), युवा नेते विनय कदम, ग्रामीण अध्यक्ष गणपत पाटील, रमेश ताशीलदार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महामंडळासाठी 100 कोटी रुपये अनुदान जाहीर केले. या अनुदानातील पहिल्या टप्प्यातील 50 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यामधून श्री शहाजीराजे समृद्धी योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी पन्नास हजार ते एक लाख रुपये कर्ज स्वरूपात अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येईल. यामध्ये 20% सबसिडी मिळणार आहे. याच योजनेतील अन्य एका युनिट नुसार एक ते दोन लाख रुपये पर्यंत चार टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये 15 टक्के सबसिडी मिळणार आहे. सदर योजनेसाठी HTTPS://suvidha.karnaraka.gov.in पोर्टलवर ऑनलाईन द्वारे अर्ज करावेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रोत्साहन योजनेअंतर्गत मराठा समाजातील तरुणांना रोजगाराभिमुख करून कौशल्य विकसित करण्यासाठी, सरकारने आय टी आय एस, जी टी टी सी, के जी टी टी आय इत्यादींमधील अल्पकालीन अभ्यासक्रमांद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य सॉफ्टवेअर द्वारे अर्ज मागविले आहेत. यामध्ये अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्षे असावे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदारांनी सदर योजनेसाठी उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर योजनेसाठी ऑनलाईन कौशल्य कर्नाटक पोर्टल https:// www.kaushalkar.com सॉफ्टवेअर द्वारे अर्ज सादर करण्याचे आहेत. अर्जदाराचा आधार क्रमांक विद्यमान बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.वरील योजनांची अंमलबजावणी 19 जुलै 2022 ते 19 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी आहे.
अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, त्याचबरोबर आगामी काळातही कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाच्या वतीने शेतकरी आणि आर्थिक दुर्बल तसेच उच्च शिक्षणासाठी योजना जाहीर केल्या जाणार आहेत. असेही कडोलकर यांनी स्पष्ट केले.