मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून हजारो युवा उद्योजक निर्माण करणारे आणि हजारो लोकांच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर कोल्हापूरचे शिवश्री विठ्ठल कोतेकर हे उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगावचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सिद्धार्थ हायड्रोलिकचे शशिकांत चंदगडकर, प्रभात कास्टिंगचे विक्रम सैनुचे, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, संचालक शिवाजी हंगिरगेकर, ॲड. सुधीर चव्हाण, गोपाळ कुकडोलकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेंद्र मुतगेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, सुनील मायानाचे, बसवंत हलगेकर,म. ए. युवा समिती खानापूरचे अध्यक्ष धनंजय पाटील, हभप शंकर बाबली आदी मान्यवर मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. तरी मराठा समाज बांधवांनी आपल्या युवा उद्योजक /व्यावसायिक मित्रमंडळींसह मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.
मराठा युवकांमधील निराशा व कमतरता दूर करण्यासाठी आणि त्यांना ध्येयवादी बनवण्यासाठी भारतातील राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता या सर्व स्तरावर कायमस्वरूपी मराठा साम्राज्य निर्माण करण्याची शपथ मराठा सेवा संघाने घेतली आहे.
त्यासाठी मराठा युवा उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्या असलेल्या अडीअडचणी दूर करून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आणि समाजातील सर्व नव उद्योजकांना संघटित करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बेळगावातील हा दुसरा मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.