बेळगावमध्ये गेल्या आथंडाव्यात एका मागोमाग एक असे दोन अपघात घडले आणि या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला. नागरिकांनी यासंदर्भात जोरदार निदर्शने करत विरोध दर्शविला. आंदोलन झाले, रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष देखील वेधले गेले.
अपघातात बळी गेल्यानंतर रहदारी विभाग आणि प्रशासनाला खडबडून जाग आली… आणि लगोलग अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात आले. पण मग पुढे काय? हा प्रश्न आता पुन्हा नागरिकांसमोर उभा आहे.
रस्ते अपघातात दोन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. आणि अपघात मार्गावर गतिरोधक बसवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. हि एकेरी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली.
मात्र ज्या मार्गाने हि वाहतूक वळविण्यात आली त्या मार्गावरदेखील सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळा आहेत. या मार्गावरून हि वाहतूक वळविण्यात आल्याने ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार झाला आहे.
तातडीने प्रशासनाने दखल घेऊन गतिरोधक बसविले, काँक्रिटीकरणही झाले.. आता हे गतिरोधकांचा वापर करण्यास काहीच हरकत नसून, गतिरोधकाच्या दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु करण्यात यावी, जेणेकरून अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा शाळेच्या मार्गावरून होऊ नये, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी नागरीकातून होत आहे.