भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन! देवादिकांच्या काळापासून रक्षाबंधनाचा महत्व आहे. देवमंत्री गुरु बृहस्पती यांच्याकडून युद्ध थांबवण्याची परवानगी घेऊन इंद्राणींनी देवराज इंद्राचे रक्षाबंधन केले. या प्रभावामुळे असुरांचा वध करण्यात इंद्राला यश आले अशी आख्यायिका आहे. अनादी काळापासून सुरु असलेली राखी पौर्णिमा आजही तितक्याच पवित्रतेने साजरा होतो.
यंदा गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा असून या धर्तीवर बेळगावमधील प्रमुख बाजारपेठेसह अनेक दुकानांमध्ये राख्यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे.
आकर्षक आणि नवनवीन पद्धतींच्या राख्यांनी बाजारपेठ सजली असून अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणासाठी महिलावर्गाने राखी खरेदीसाठी गर्दी केली आहे.
बच्चेकंपनीला आकर्षित करण्यासाठी अनेकविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध झाला असून यात बेनटेन, छोटा भीम, डोरेमॉन यासारख्या अनेक कार्टून व्यक्तीरेखा असलेल्या राख्यांचा यात समावेश आहे. ५ रुपये ते २५० रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध असून गुजराती किंवा मारवाडी समाजात बांधल्या जाणाऱ्या लुम्बा राख्याही लक्षवेधी ठरत आहेत.
स्वातंत्र्य दिन देखील लागोपाठ येत असून शहरातील प्रमुख बाजारपेठेत राख्यांसह तिरंगा ध्वज विक्रीसाठीही स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांकडून तिरंग्याचीही खरेदी अधिक प्रमाणात होत असून, श्रावण महिन्यातील पूजा, धार्मिक कार्यक्रम यासाठी लागणाऱ्या साहित्यासह राखी, तिरंगा ध्वज आणि भेटवस्तूंच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.