महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी कोट्याविधी रुपये खर्चून पिरनवाडी येथे उभा करण्यात आलेल्या गांधी भवनाकडे दुर्लक्ष झाले असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना गांधीभवन आवरात मात्र झेंडा फडकला नसल्याचे दिसून आले आहे यामुळे संबंधित विभागाला गांधीभवनाचां विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिरनवाडी ग्रामपंचायत च्या मागच्या बाजूला भव्य असे गांधी भवन बांधण्यात आले असून सदर गांधीभवनाचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या उपस्थितीत पार पडला होता.मात्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव या ठिकाणी पार पडला नसून सर्वत्र वातावरण तिरंगामय झाले असताना गांधीभवन ची इमारत मात्र तिरंगाविना असल्याचे निदर्शनास आले आहे. याचे नेमके कारण काय हे मात्र समजलेले नाही.
गांधी भवनाची निर्मिती करत असताना दुरदृष्टीने सामाजिक विचार करून महात्मा गांधी यांच्या सत्य अहिंसा या विचारांची रुजवणूक करण्यासाठी म्हणून योजना आखण्यात आली होती. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुस्तकालय तसेच डिजिटल रूम देखील बनविण्यात येणार आहे. मात्र सध्या सदर इमारतीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे प्रकर्षाने जाणून येत आहे.
म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम तसेच विद्युत रोषणाई करून राबविण्यात येत असताना गांधी भवन मात्र दुर्लक्षित राहिले आहे. हरघर तिरंगा च्या माध्यमातून घरोघरी तिरंगा फडकविण्यात आला आहे मागील तीन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा दिमाखात फडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मात्र गांधी भवनाच्या इमारतीवर कोणत्याही प्रकारे तिरंगा देखील लावण्यात आलेला नाही परिणामी सदर इमारत दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.
सदर गांधी भवनाची इमारत बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सदर इमारतीच्या परिसरात महात्मा गांधी यांचे पुतला उभारण्यात आला आहे.पिरणवाडी येथील हिरव्यागार शेतीवाडीत बांधण्यात आलेले हे भवन अधिकच आकर्षित आहे. मात्र यंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा झाला नसल्याचे दिसून येत आहे.