Saturday, December 7, 2024

/

‘मुधोळ हाऊंड’ घेणार बिबट्याचा’ शोध!

 belgaum

बेळगाव शहरात गेल्या ८ ते १० दिवसात बिबट्यामुळे चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शनिवारपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरातील २२ शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या भागात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली असून वनविभाग रात्रंदिवस बिबट्याचा शोध घेण्यात तत्पर आहेत. बिबट्याला शोधण्यासाठी ८ ठिकाणी सापळे रचण्यात आले असून आता या शोध मोहिमेत मुधोळ जातीच्या श्वानाचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. राष्ट्रीय मान्यताप्राप्त आणि लष्करात वापर केल्या जाणाऱ्या मुधोळ श्वानामुळे बिबट्याचा शोध घेणे शक्य होईल, यामुळे मुधोळ श्वान शोध मोहिमेसाठी आणण्यात येणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर बेळगावमधील विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधत राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया केली.

कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावावरून या प्रजातीचं नाव ठेवण्यात आलं असून मुधोळ हाऊंड शिकार आणि सुरक्षा करण्यासंबंधीत कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. मुधोळ हाऊंड श्वान अत्यंत वेगाने धावू शकतात. यांची हालचाल अतिशय चपळ असते. यांच्यातील उर्जा, तीक्ष्ण नजर आणि गंध ओळखण्याची क्षमता खूप जास्त आहे. यामुळे बेळगावमध्ये गोल्फ कोर्स मैदान परिसरातील बिबट्याचा शोध घेण्यासाठी मुधोळ हाऊंडचा वापर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.Govind karjol

यावेळी बेळगाव भाजपमध्ये सध्या अंतर्गत मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. याचा प्रत्यय बेळगावमधील आमदारांनी जिल्हा पालकमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याववरुन आला असून या वक्तव्याप्रकरणी पालकमंत्र्यांनी आमदारांवर पलटवार केलाय. बेळ्ळारी नाला आणि स्थानिक समस्यांसंदर्भात पालकमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारींवर त्यांनी स्वतःच्या पातळीवर शेतकरी आणि स्थानिकांशी चर्चा केली. यावरून आमदारांनी पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्र्यांनी आपण आपली जबाबदारी पार पाडली, यासंदर्भात आमदारांची बैठक घेण्यात येणार असून आमच्या चर्चेत जे झाले त्याविषयी आमदारांना कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांनी ती खुशाल आपल्याला विचारावी, असा प्रतिटोला पालकमंत्र्यांनी लगावला.

यानंतर म्हादईप्रश्नी बोलताना पालकमंत्र्यांनी यापूर्वीच्या सरकारने केलेल्या गोष्टींवर ताशेरे ओढत आपण राजकारण किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नाही तर जनतेच्या हितासाठी म्हादईप्रश्नी सकारात्मक कार्य आणि प्रयत्न करत असल्याचे सांगितले. म्हादईतील ३.९ टीएमसी पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध होणार असून यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी याआधीच प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपले सरकार हे केवळ आश्वासने देत नसून म्हादई प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूदही केली असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रश्न पिण्याच्या पाण्यासंदर्भात असून केंद्र सरकारकडून आपल्या प्रस्तावाला नक्कीच मंजुरी मिळेल असा विश्वासही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बोलून दाखविला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.