मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र तसे निखालस खोटे व बिनबुडाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा मी कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहीन, असा खुलासा बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हाळू नारायण मजूकर यांनी केला आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बाकनुर -बडस विभागाकडे एका लेखी पत्राद्वारे बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हाळू मजूकर यांनी उपरोक्त खुलासा केला आहे. माझ्या कांही वैयक्तिक व खाजगी कामासाठी मी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटण्यास गेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा मुलगा व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माझा पुष्पहार घालून सत्कार केला. त्यानंतर त्यांनी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची बातमी काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांना दिली.
मात्र मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि यापुढेही मी समितीमध्ये आहे. मात्र जो गैरसमज झाला त्याबद्दल मी स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा ग्रामस्थ कमिटीकडे देत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पुढील कार्य करीन. चौकशी करून यापुढेही माझ्यावर विश्वास ठेवावा. आपण जो निर्णय द्याल तो मी मान्य करेन, अशा आशयाचा तपशील अध्यक्ष मजूकर यांच्या पत्रात नमूद आहे.
*बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षांचा खुलासा- मी काँग्रेस मध्ये प्रवेश केला नाही….*
मला फसवून बोलावून काँग्रेस प्रवेश करवून घेतला-बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षांचा खुलासा@laxmi_hebbalkar @DKShivakumar @JarkiholiSatish pic.twitter.com/dOeVFhmyjc
— Belgaumlive (@belgaumlive) August 1, 2022
सदर पत्र सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हाळू नारायण मजूकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी माझ्या वैयक्तिक खाजगी कामासाठी मी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना त्यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटण्यासाठी गेलो होतो.
त्यावेळी त्यांनी मला बोलावून घेऊन काँग्रेसचा शेला माझ्या खांद्यावर घालून माझा सत्कार केला. त्यानंतर मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी कांही वृत्तपत्र व माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तथापि यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. आजही मी समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहणार आहे असे, मजूकर यांनी स्पष्ट केले.