सध्या संपूर्ण बेळगाव शहरातील सर्वात भीतीदायक मार्ग हा गोल्फ कोर्स मैदान परिसरातील मार्ग ठरत आहे. गांधी चौक ते ज्योती महाविद्यालय, क्लब रोड आणि सेंट झेवियर्स ते गांधी चौक या परिसरात अंधाराचे साम्राज्य असून या भागात दिसलेल्या बिबट्यामुळे या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे. आधीच बिबट्याची दहशत त्यात अंधाराने भारलेला रस्ता या साऱ्या परिस्थितीमुळे एखाद्या भयपटाप्रमाणे या मार्गाची परिस्थिती झाली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून या भागात तळ ठोकून असलेला बिबट्या आज पुन्हा भर रस्त्यात आढळून आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या शोध मोहिमेत वनखात्याला हुलकावणी देत बिबट्या गोल्फ कोर्स मैदानातून रास्ता ओलांडून गेल्याचा व्हिडीओ सोमवारी संपूर्ण दिवसभर प्रत्येकाच्या मोबाईलवर अक्षरशः वायरल झाला.
यादरम्यान अनेक जागरूक नागरिकांनी या मार्गावरून मार्गस्थ होताना बिबट्यासह येथील अंधाराची भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. या पूर्ण भागातील मार्गावर एकही पथदीप सुरु नसल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले.
दरम्यान हा भाग छावणी सीमा परिषदेच्या अखत्यारीत येत असून हेस्कॉमची बिले थकीत असल्याने या भागात पथदीप नसल्याची माहिती पुढे आली आहे. हेस्कॉम आणि छावणी सीमा परिषदेत बिल पेमेंट वरून सुरु असलेला संघर्ष या आधारासाठी कारणीभूत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
हनुमान नगर, जाधव नगर यासह गोल्फ कोर्स मैदान परिसरात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. या भागातील नागरिकांकडून गेल्या दोन वर्षांपासून पथदीपांची मागणी केली जात आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र याचा काहीच फायदा झालेला दिसून येत नाही. या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच मार्गस्थ व्हावे लागत आहे.
कधी खड्ड्यांचे भय तर कधी अंधाऱ्या परिस्थितीत लुटमारीसारखे प्रकार या साऱ्या गोष्टी डोक्यात ठेऊन मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. हे इतके कमी नव्हते कि यात आता बिबट्याची भर पडली आहे. या भागातील अंधार आणि भेडसावणाऱ्या समस्या यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अनेकवेळा निवेदने, मागण्या करूनही अधिकारी वर्गाचे झालेले दुर्लक्ष हे एखाद्या नागरिकांसाठी जीवघेणे ठरू शकते. गेल्या वेळी झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात संपूर्ण शहर लखलखीत करण्यात आले मात्र त्यावेळीही हा मार्ग दुर्लक्षितच राहिला आहे.
सीमा छावणी परिषद आणि हेस्कॉम यांच्यात असलेल्या अंतर्गत वादाला नागरिक बळी ठरत असून आता तरी या भागातील मार्गांवर पथदीप बसवून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यात यावा अशी आर्त मागणी नागरीकातून होत आहे.