बेळगावच्या कॅम्प लगतचा परिसर म्हणजे दाट झाडी असलेला परिसर होय. त्यातच रेस कोर्स येथे वन झाडी असल्याने हा भाग जंगल परीसरासारखाच दिसतो. एरव्ही गोल्फ कोर्स, जाधव नगर, हनुमान नगर परिसरात सकाळची स्वच्छ हवा खाण्यासाठी मोठ्या संख्येने बेळगावकर बाहेर पडत असतात. मात्र, शनिवारी सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या खूपच कमी दिसून आली.. याला कारण आहे या परिसरात दिसलेला बिबट्या!
शुक्रवारी दुपारी जाधव नगर भागात गवंडी कामगारावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर या भागातील सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा वावर कैद झाला आहे. पोलीस, अग्निशामक, एसडीआरएफ आणि वन खात्याचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेताहेत. गदगहुन आलेले वन खात्याचे विशेष पथक कालपासूनच शोध मोहिमेत सहभागी झाले आहे. एकूणच जाधव नगर, हनुमान नगर आणि रेस कोर्स भागातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
पोलिसांच्या आवाहनानंतर शनिवारी मॉर्निंग वाकला जाणाऱ्यांची संख्या तुरळक होती . रात्रीच्या वेळीही कुणी घरा बाहेर एकटे पडले नाहीत, बिबट्या जेरबंद होईपर्यंत सगळ्यांच्या नजरा वृत्त वाहिन्या, डिजिटल मीडियाकडे लागून राहिल्या आहेत. शुक्रवारी रात्री बिबट्याला सर्वाधिक आवडणारी शिकार म्हणजेच कुत्र्याला सापळ्यात घालून सापळा रचण्यात आला होता. मात्र सकाळपर्यंत तरी बिबट्याचा शोध लागला नव्हता.
जंगलात राहणारा बिबट्या नागरी वस्तीत कसा काय आला असेल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्या बाबतीत जाणकार अभ्यासक आणि काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता जरी रेस कोर्सला घनदाट जंगल असले तरी हा बिबट्या काकतीच्या जंगलातून नागरी वसाहतीकडे आला असण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बिबट्याची आवडती शिकार कुत्रा असल्याने या भागात बिबट्याकडून भटक्या कुत्र्यांचा शिकार करण्यात आला आहे का याचाही तपास घेण्यात येत आहे.
कोणत्या भागातील सीसीटीव्हीत बिबट्या कैद झालाय याचाही अभ्यास फॉरेस्ट आणि पोलिसांकडून विभागाकडून केला जात आहे. याप्रकरणी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रवींद्र गडादी स्वतः लक्ष ठेऊन आहेत.
काकती जंगलातुन भुयारी आणि झाडा झुडुपाचा थेट रस्ता रेस कोर्स मैदाना पर्यंत आहे. याच रस्त्याद्वारे बिबट्या नागरी वसाहतीत आला असावा, या शिवाय रेस कोर्स ते जाधव नगर नाल्यामधून मोठ्या पाईप मधून जाधव नगरात नागरी वसाहतीत गेला असावा, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.