टपाल खात्यातर्फे पुन्हा एकदा साॅव्हरीन गोल्ड बॉंड योजना सुरू करण्यात आली असून आजपासून पाच दिवस म्हणजे येत्या शुक्रवार दि. 26 ऑगस्टपर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे.
सदर योजनेअंतर्गत 5197 रुपये प्रति ग्रॅमने हा सोन्याचा साॅव्हरीन गोल्ड बॉंड ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. फक्त टपाल कार्यालयात ही योजना कार्यान्वित आहे. या योजनेत प्रतिवर्ष 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.
आठ वर्षापर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात. तसेच 5 वर्षानंतर आपली गुंतवणूक आपल्याला काढता येऊ शकते. ग्राहकांना 1 ग्रॅम पासून 4000 ग्रॅम पर्यंत या बॉण्डच्या माध्यमातून सोने खरेदी करता येऊ शकते. आठ वर्षानंतर बाजारात होण्याचा जो दर आहे त्या दराने या बॉण्डची किंमत मिळते.
टपाल विभाग वर्षातून दोन वेळा ही योजना लागू करते. मात्र नुकतीच मे महिन्यात ही योजना लागू करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी 7 किलो किमतीच्या बॉण्डची विक्री झाली होती.
यात बेळगावचा देशात पहिला क्रमांक आला होता. आता 10 किलोपर्यंत विक्री होण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे, अशी माहिती बेळगाव पोस्ट कार्यालयाचे पोस्ट अधीक्षक विजय नरसिंह यांनी दिली.