विज्ञानाची कास धरून आकाशात झेप घेणाऱ्या माणसाने अद्यापही अंधश्रद्धेची कास सोडलेली दिसत नाही. कोणत्याही साधू, बाबाच्या वेशात येणाऱ्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवून अजूनही कुप्रथांच्या विळख्यातून माणूस बाहेर आलेला नाही. सध्या या सर्वांची प्रचिती मूडलगी येथील एका प्रकारावरून आली आहे.
सरकारी नोकरीचे आमिष, निवडणूक जिंकून देण्याचे आमिष आणि अशी कितीतरी प्रलोभने देऊन अनेक भोळ्या नागरिकांना लुबाडून साधूच्या वेशातील एका भोंदू बाबाने चक्क खुनाचा अपराध केला आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या मला आणि भगवे वस्त्र अशा अवतारातील साधू बाबांना पाहून अनेक भोळेभाबडे लोक नतमस्तक होतात. मात्र या ढोंगी पेहरावामागे कोणते कपट लपलेले असते हे कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
मूडलगी येथील आलं प्रभू हिरेमठ या नावाने बाबागिरीचा व्यवसाय चालविणाऱ्या या भोंदूबाबाने ६ महिन्यांपूर्वी संतोष हवळेद्दगोळ या इसमाकडून ४ लाख रुपये उकळून एस सी कोट्यातून सरकारी नोकरीचे आमिष दाखविले. इतकेच नाही तर ईव्हीएम मशीन हॅक करून बीबीएमपी निवडणूक जिकून देईन असे आश्वासन देत ५ लाख रुपये उकळले. या तर केवळ निदर्शनात आणि उजेडात आलेल्या गोष्टी आहेत. मात्र या भोंदू बाबाने आणखी किती उपद्व्याप करून ठेवलेत हे देवच जाणे!
सदर भोंदूबाबाला सरकारी नोकरीसाठी दिलेले ४ लाख रुपये परत मिळविण्यासाठी संतोष हवळेद्दगोळ यांनी विचारणा केली असता त्यांच्यावर या भोंदू बाबाने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून चाकू हल्ला केलाय.
यानंतर अल्लमप्रभू हिरेमठ या भोंदू बाबावर बेंगळुरूचे रहिवासी प्रशांतकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूडलगी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तक्रारीनंतर मूडलगी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली असून त्याच्यावर फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गोकाक डीएसपींनी पुढील तपास हाती घेतला असून नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.