सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात यावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पावसाचाही तमा न बाळगता शेकडो मराठी भाषिक एकवटले आणि त्यांनी मराठी परिपत्रकासाठी आग्रह धरत आंदोलन केले.
सरकारी परिपत्रके, कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी आज ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनासाठी बेळगाव, ग्रामीण भाग, खानापूर तालुक्यासह संपूर्ण सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक न्याय्य मागणीसाठी एकवटले. सकाळी ११.४५ च्या दरम्यान सुरु झालेल्या या आंदोलनादरम्यान धो धो पाऊस बरसत असूनही छत्र्या, रेनकोट घेऊनही मराठी भाषिक आंदोलन करतच राहिले. या आंदोलनाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला पुन्हा मराठी आवाज दाखवून देण्यात आला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळावीत यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पावसाचा जोर न ओसरल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पावसाने उघडीप दिल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी दिली.
कायद्यात तरतूद असूनही, घटनेने अधिकार देऊनही , ७५ वर्षांचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्योत्सव साजरा करताना मराठी कागदपत्रांसाठी अशापद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते हे लोकशाहीचे दुर्दैव असल्याचे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले. मुसळधार पावसात देखील सीमाभागातील मराठी जनता अशापद्धतीने या आंदोलनास उपस्थित राहिली याबद्दल त्यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले.
म. ए. समितीने पुकारलेल्या आंदोलनात मराठी भाषेवर असलेले प्रेम, मराठी अस्मिता जपण्यासाठी केवळ युवकच नाही तर ज्येष्ठ समिती कार्यकर्तेही पावसाची तमा न बाळगता या आंदोलनात सहभागी झाले, ब्रिटिशांपेक्षाही कर्नाटक प्रशासन मराठी भाषिकांवर ज्या पद्धतीने अत्याचार करत आहे, हा स्वातंत्र्याचा अवमान आहे, क्रांती दिनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे नक्कीच क्रांती होईल, असा विश्वास माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केला.
या आंदोलनास उपस्थित अनेक मान्यवरांनी कर्नाटकी अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात दीपक दळवी, मनोहर किणेकर, संतोष मंडलिक, सरस्वती पाटील,राजाभाऊ पाटील ,सरिता पाटील, रेणू किल्लेकर,शाम पाटील, सुधीर चव्हाण, आर एम चौगुले,खानापूरचे गोपाळ देसाई गोपाळ पाटील , दिगंबर पाटील, विलास बेळगावकर, धनंजय पाटील , साधना पाटील, शिवानी पाटील, प्रकाश मरगाळे, आर. आय. पाटील, राजाभाऊ पाटील इतर समिती नेते आणि शेकडो युवक सहभागी झाले होते.