मराठी जनतेला घटनेने दिलेल्या त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत आहे असे असताना कितीही संकटे आली तरी मराठी कागदपत्रे मिळेपर्यंत लढा देत राहू, याच निर्धाराने आम्ही प्रेरित झालो आहोत, असे मत मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.
शहापूर विभाग समितीची बैठक शनिवारी (दि. 6) गंगापुरी मठ येथे झाली. या बैठकीत सोमवारी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेत कागदपत्रे उपलब्ध करून दिली पाहिजेत या मागणीसाठी मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने सोमवारी 8 ऑगष्ट रोजी सकाळी ठीक 11:00 वाजल्यापासून सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत धरणे आंदोलन (ठिय्याआंदोलन)कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक मंडळे व महिला मंडळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन देखील दळवी यांनी केले.यावेळी गल्लीचे पंच राजाराम मजुकर यांनी ठिय्या आंदोलनाला गल्लीच्या वतीने पाठिंबा दिला आहे.
महादेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी,नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, दीपक बिर्जे, शिवानी पाटील, साधना पाटील, विनोद आंबेवाडीकर, बापू भडंगे, राजेंद्र गावडोजी आदी उपस्थित होते.
दरम्यान सोमवारच्या ठिय्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्वांनी शांततेत यावे.पावसाळी वातावरण लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.