बेळगाव येथे कांही आठवड्यांपासून ठाण मांडून असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्या हिस्त्र वन्य प्राण्याला पकडणे सोपे नाही, तथापि जर माझ्या राजीनाम्यामुळे बिबट्या सापडणार असेल तर मी केंव्हाही राजीनामा देण्यास तयार आहे, असे वनखात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी सोमवारी स्पष्ट केले.
बिबट्याला पकडण्यात अपयश येत असल्याबद्दल बेळगावच्या महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी वनमंत्री उमेश कत्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना माझ्या राजीनामेमुळे बेळगाव येथील बिबट्या वनखात्याच्या स्वाधीन होणार असेल तर मी माझा पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे मंत्री कत्ती यांनी काल सांगितले. यासंदर्भात खासदार इराण्णा कडाडी यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या 26 दिवसापासून बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडून बसलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व वनखाते संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. तथापि बिबट्या अद्याप पकडला गेलेला नाही. वनखात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस बिबट्याला पकडणार आहे का? असा खोचक सवाल खासदार कडाडी यांनी केला. बिबट्याचा वावर असलेल्या गोल्फ मैदानाची पाहणी केल्यानंतर काल ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणूक जवळ आली की काँग्रेसवाले कार्यरत होतात.
आता त्यांनी बिबट्याला पकडण्यात येत असलेल्या अपयशास वनमंत्री उमेश कत्ती यांना कारणीभूत धरले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने काय होणार आहे? हा राजकीय स्टंट आहे. आपण वनविभागाकडून सर्व माहिती घेऊन पाहणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे खासदार इराण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले. एकूणच गोल्फ कोर्स जंगलात असलेल्या बिबट्यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, बेळगाव येथील जाधवनगर परिसरात गेल्या 5 ऑगस्ट रोजी एका गवंडी कामगारावर हल्ला करणारा आणि त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी गोल्फ कोर्स मैदान परिसरात दिसलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलिस आणि वन खात्याची शोध मोहीम सुरू असताना मंत्री उमेश कत्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. बिबट्या सतत कोठे ना कुठे आढळून येत असल्यामुळे सीमेवरील जिल्ह्यातील नागरिक आपल्या कारगाड्या, दुचाकी वापरणे सोडून देऊन सरकारी बसने प्रवास करत आहेत. ‘हनुमाननगर येथून डबल रोड मार्गे एकट्याने कारमधून प्रवास करणे मला असुरक्षित वाटत नसल्यामुळे मी सह्याद्रीनगर ते सीबीटी या बसमधून प्रवास करून हॉटेल जवळ उतरतो आणि तिथून माझी कार घेऊन कामावर जातो’, असे सतीश पाटील या स्थानिक रहिवाशाने सांगितले. सह्याद्रीनगर आणि कुवेंपुनगर येथील अनेक रहिवासी सध्या आपल्या प्रमाणेच शहरी बसमधून प्रवास करत आहेत असेही ते म्हणाले.
अनेक ऑटो रिक्षा चालकांनी संबंधित परिसराचे भाडे घेणे म्हणजे त्या ठिकाणची प्रवासी वाहतूक करणे बंद केले आहे. यापूर्वी त्या भागात प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी सीट शेअरिंग पद्धतीवर प्रत्येकी 20 रुपये रिक्षा भाडे आकारले जात होते. मात्र आता हा दर प्रत्येकी 40 ते 50 रुपये इतका वाढला आहे. शेअरिंग न करता एकट्यालाच रिक्षातून जावयाचे असल्यास तीनशे रुपये मोजावे लागत आहेत अशी माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली. मात्र जय भीम ऑटोरिक्षा ड्रायव्हर आणि ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज अवरोळ्ळी यांनी मात्र ऑटोरिक्षा चालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे उकळत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.