गेल्या जवळपास 22 दिवसापासून शहरात दाखल झालेल्या बिबट्याला शोधून पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून आज गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हिंडलगा गणेश मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मिलिटरी कॉर्टर्स परिसरात बिबट्याचे पुन्हा दर्शन घडले आणि नेहमीप्रमाणेच त्याला जेरबंद करण्यात वन खात्याला अपयश आले.
हिंडलगा गणेश मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या हनुमाननगर डबल रोडवर असलेल्या मिलिटरी क्वार्टर्स गेट जवळ आज दुपारी तीनच्या सुमारास बिबट्या दृष्टीस पडून पुन्हा गोल्फ मैदान परिसरातील जंगलात गायब झाला. बिबट्याला पकडण्यासाठी गोल्फ मैदान परिसरात आज गुरुवारी सकाळी दोन हत्ती, वन्य प्राण्यांना बेशुद्ध करणारे शार्प शूटर्स, ट्रॅप कॅमेरे, वन्यप्राणी पकडण्याचे सापळे, जाळ्या आणि सुमारे 400 वन व पोलीस खात्याचे कर्मचारी आदींच्या सहाय्याने जोरदार शोध मोहीम उघडण्यात आली आहे.
ही मोहीम सुरू असताना झाडाझुडपात दडून बसलेला बिबट्या मोठी झेप घेऊन सर्वांच्या तावडीतून निसटला तो थेट मिलिटरी कॉर्टरच्या ठिकाणी पोहोचला. तेंव्हा त्याच्या मागोमाग पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
मिलिटरी क्वार्टर्स येथील घरांच्या आवारामध्ये नजरेस पडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी धावाधाव करून कर्मचाऱ्यांनी घेराबंदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे त्यांना हुलकावणी देऊन तो चपळ बिबट्या पुन्हा गोल्फ मैदान परिसरातील जंगलात पसार झाला.
या पद्धतीने बिबट्याला पकडण्याची मोहीम परत एकदा असफल ठरली. एकंदर त्या चलाख बिबट्याने पोलीस आणि वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पळापळ करावयास लावून त्यांची पूर्ती दमछाक करून सोडली आहे.