बेळगाव लाईव्ह विशेष /अतिवृष्टी असो किंवा इतर कोणतीही आपत्ती बेळगावकर नेहमीच प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मिळतंजुळतं बनवतो. सध्या बेळगावच्या हिटलिस्टवर बिबट्या चा विषय जितका भीतीदायक आणि गंभीर आहे तितकाच विविध स्वरूपातील चर्चेचा ही बनला आहे. गेल्या पंधरा दिवसाहुन अधिक काळ तळ ठोकून असलेल्या बिबट्याने अनेक बेळगावकरांची झोप उडवली आहे, तर प्रशासनाची तारांबळ होईल अशा पद्धतीने बिबट्याची बेळगाव वारी सुरू आहे.
यादरम्यान प्रशासनासह वनविभाग, पोलीस विभाग, युद्धपातळीवर बिबट्या शोध मोहीम राबवत आहे. मात्र चतुर आणि चलाख असलेल्या बिबट्याने मात्र या साऱ्यांच्या हातावर तुरी दिली आहे. एकीकडे बिबट्या मिळत नसल्याने शोध मोहिमेत सहभागी असलेल्या साऱ्यांची झोप उडाली आहे, तर दुसरी कडे नेटकऱ्यांनी मात्र सोशल साईट वर मिम्सचा नुसता धुमाकूळ घातला आहे.
व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा अनेक सोशल साईटवर बिबट्या वरून धमाल मिम्स बनवत हशा पिकत आहे. अनेकांच्या व्हाट्सअप स्टेटसवर बिबट्या संदर्भातील अनेक विनोद सध्या बेळगावकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. बेळगावची हवा, येथील वातावरण आणि एकंदर निसर्ग याची भुरळ बेळगाव मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला नेहमीच पडते. यात वन्यजीव तरी कसे मागे पडतील? याच अनुषंगाने बिबट्याने बेळगावकरांचा पाहुणचार घेण्यासाठी गोल्फ कोर्स मैदान परिसर निवडला असल्याची उपहासात्मक चर्चादेखील बेळगावकरांमध्ये रंगत आहे!
गोल्फ कोर्स मैदान परिसरातील नागरिकांना बिबट्या चा विषय जरी गांभीर्याचा वाटत असला तरी इतर बेळगावकरांसाठी हा विषय सध्या विनोदाचा ठरत आहे. सोमवारी एका मिनी बस चालकाला बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाने पुन्हा बिबट्या शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आणि या संदर्भातील देखील व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला. बिबट्या शोध मोहिमेअंतर्गत वनविभाग आणि इतर कर्मचाऱ्यांसमोरून ज्या पद्धतीने बिबट्या हातावर तुरी देऊन गेला यावरील व्हिडिओ देखील सोशल साईट वर चवीने चघळला गेला.
वनविभागाच्या अपयशावर बेळगावकरांनी सोशल साईटच्या माध्यमातून ताशेरे ओढले. यावरदेखील अनेक मिम्स वायरल झाले. दरम्यान अनेक फेक पोस्ट्स देखील वायरल झाल्या. ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून अशा फेक पोस्ट्स मुळे कशापद्धतीने नुकसान होते यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. मात्र सोशल साईटमध्ये गुंतलेल्या बेळगावकरांनी मिम्स च्या माध्यमातून बिबट्याचा विषय चवीने चघळला.
बेळगावची हवा पाणी उत्तम असल्याने इथेच वास्तव्य करणारा बिबट्या, आपल्या कुटुंबासमवेत ‘सेटल्ड’ होण्याचा विचार करणारा बिबटया, बिबट्याचा शोध घेत इतर प्राण्यांची बेळगावमध्ये झालेली एंट्री, बिबट्याला मिळणारा पाहुणचार पाहून जंगलातून त्याला शोधात आलेला सिंह, यासह वैयक्तिक आयुष्याशीही बिबट्याची बेळगाववारी जोडत बेळगावकर नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ घातला आहे.