बेळगाव शहरात सध्या बिबट्या संदर्भातील चर्चा, मिम्स, बडबड आणि गप्पांना ऊत आला आहे. आज 21 दिवस उलटून गेले मात्र अद्यापही हा चलाख वन्यप्राणी वन खात्याच्या हाती लागलेला नाही.
क्लब रोड येथे रस्ता ओलांडणाऱ्या आणि ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेल्या बिबट्याला प्रत्यक्ष पकडण्यात वनखात्याच्या 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. आयएएनएस माहितीनुसार वन खाते बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेवर दिवसाकाठी 2 ते 3 लाख रुपये खर्च करत आहे.
या पद्धतीने आतापर्यंत वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपये खर्ची घातले आहेत. शिमोगा येथील सकरीबैल कॅम्प येथून मागविलेले दोन प्रशिक्षित हत्ती आणि त्यांना हाताळणारे वनखातेचे पथक बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत सहाय्य करण्यासाठी बेळगाव गोल्फ कोर्स मैदानात दाखल झाले असले तरी बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.
बिबट्याच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून गोल्फ कोर्स मैदान परिसरातील शाळांना गेल्या 21 दिवसापासून सुट्टी देण्यात आली असून ऑनलाईन वर्गाद्वारे मुलांची शिक्षण सुरू आहे. गोल्फ कोर्स मैदान प्रत्यक्षात जवळपास 250 एकर इतक्या प्रचंड मोठ्या परिसरात पसरले असून येथील मनुष्य स्पर्श नसलेला अनभिज्ञ असा बराचसा भाग बिबट्याला गायब होण्यासाठी सुरक्षित स्थान बनले आहे.
व्हाट्सअप बिबट्या संदर्भातील मिम्सनी ओथंबून वाहू लागण्याबरोबरच नेटकऱ्यांनी बिबट्याचे तो बेळगावचा रहिवासी असल्याचा पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील जारी केले आहे. दरम्यान वनखाते बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी चलाख बिबट्या समोर त्यांची डाळ शिजते का? हे पाहावे लागेल.