बेळगाव शहरालगत असलेल्या कणबर्गी भागात बुडणे नियोजित वसाहत आराखडा तयार केला असून सदर वसाहत योजनेला सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) कणबर्गी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने आखलेल्या कणबर्गी येथील नियोजित निवासी वसाहत योजनेला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र राज्य सरकारने नुकतीच या योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली असून या निषेधार्थ शेतकऱ्यांनी कणबर्गी रस्त्यावर टायर पेटवून निदर्शने केली.
आणि सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार संताप देखील व्यक्त केला. यादरम्यान शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने बेळगाव-कणबर्गी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. डीसीपी रवींद्र गडादी, माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांची बाजू ऐकून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
काय आहे हि योजना?
कणबर्गी येथे १५९ एकर शेत जमीन संपादित करून त्यावर निवासी वसाहत विकसित करण्यासाठी बुडा योजना क्र. ६१ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपादनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १५९.२३ एकरपैकी ५०.१८ गुंठे जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. या परिसरात २०० हून अधिक घरे बांधण्यात आली असून घरे बांधणाऱ्यांना एनओसी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे?
कणबर्गी येथे बुडाच्या योजना क्रमांक ६१ नुसार जमिनी संपादित करून निवासी वसाहत विकसित करण्यात येत असून या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ट खटला असूनही सरकारने योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शहराचे दोन्ही आमदार आपल्यावर अन्याय करत असून आमचा संघर्ष भविष्यातदेखील सुरूच राहील, आपल्याला जोवर न्याय मिळत नाही तोवर आमचा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.